संदीप जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : महाड-भोर तसेच माणगाव-ताम्हिणी घाटमार्गाच्या दुरवस्थेमुळे महाडसह दक्षिण रायगडवासीयांना पुण्याची वाट अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणाºया गैरसोईमुळे मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
पुण्याला जाण्यासाठी दक्षिण रायगडवासीयांना भोर आणि ताम्हिणी हे दोन घाटमार्ग असले तरी गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे मार्गांचा प्रवास अत्यंत खडतर बनला आहे. ताम्हिणी मार्गाचे नूतनीकरण गेल्या वर्षापासून अत्यंत मंदगतीने सुरू असल्याने या मार्गाने प्रवास हा कंटाळवाणा वाटत आहे. तर महाड- भोर मार्गाचे देखील रुंदीकरण सुरू असल्याने जागोजागी रस्ता खणून ठेवला आहे. यामुळे महाड-भोर-पुणे प्रवासाला पाच तासांहून अधिक काळ लागत आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून दोन ठिकाणी घाट खचल्यामुळे पंधरा दिवसापासून हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूकदेखील पूर्णपणे बंद आहे. याला पर्याय म्हणून अनेक वाहने महाबळेश्वर मार्गाने पुण्याकडे ये-जा करीत आहेत.मात्र या मार्गाने महाडकरांना पुण्याचे अंतर लांब पडत असून इंधनाचा खर्च वाढत आहे. या दोन्ही मार्गांची तातडीने दुरुस्ती शक्य नसून दोन्ही मार्गांच्या दुरुस्तीसाठी किमान चार-पाच महिने लागणार असल्याचे बोलले जात आहे.
महाड आगारातून एसटीच्या सर्व गाड्या माणगाव ताम्हिणी मार्गाने सोडण्यात येत आहेत. मात्र महाड आगारातून शिवशाही बस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.- शिवाजी जाधव, आगार व्यवस्थापक, महाड