अरुणकुमार मेहत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी पनवेल एसटी डेपोची पाहणी केली. या पाहणीदरम्यान समोर आलेल्या डेपोतील दुरावस्थेवरून मंत्री सरनाईक यांनी परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. नाराजी व्यक्त करत , बसस्थानकाच्या सोयीसुविधासाठी सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री पद मिळाल्यानंतर गुरुवारी पनवेल, खोपोली बसस्थानक पाहणी दौरा करण्यात आला. गुरुवारी साडेआकराच्या सुमारास पनवेल बसस्थानक पाहणी दौ-यात प्रवाशांच्या समस्या जाणुन घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , शौचालय , आरक्षण खिडकी , ड्रायव्हर , कंडक्टर विश्राम गृह , शालेय मुलींच्या समस्या , परिसरातील अस्वच्छता पाहून सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्यात सुधारणा करण्यासाठी परिवहन अधिकारी यांना सूनचाही करण्यात आल्या आहेत. बसस्थानकाच्या बांधकामाविषयी देखील चर्चा करण्यात आली. बीओटी तत्वावर बांधण्यात येणा-या बसस्थानक इमारत त्यातील विविध भागाची माहिती घेतली. बांधकामातील नकाशाची पाहणी करत अधिका-यांना विविध सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सोयी -सुविधा पुरवण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
आरटीओच्या जप्तीची वाहने हटवण्याच्या सूचना
पनवेल बसस्थानकात आरटीओकडून खासगी वाहनावर कारवाई करत, ती वाहने पनवेल बसस्थानक आवारात उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे बसस्थानकातील जागा अडवून ठेवल्या प्रकरणी सरनाईक यांनी ती वाहने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, वाहने काढून न घेतल्यास आरटीओ अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पनवेल खोपोली लालपरीने प्रवास
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गुरुवारी पनवेल एसटी डेपोची पाहणी केली. त्यानंतर पनवेल बसस्थानकातून खोपोली येथील बसस्थानकास भेट देण्यासाठी लालपरीतून प्रवास केला आहे.
बसस्थानक नुतनीकरण संदर्भात मंत्रालयात बैठक
पनवेल बसस्थानकाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार पाच मजली इमारत उभारणी करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या मजल्यावर बससाठी पार्किंग ठेवण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर बसेस कशा पध्दतीने जातील याचा आढावा घेतला. त्यात चुकीचे आढळल्याने पुढील आठवड्यात या विषयी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते.
प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास अनुभव मिळावा यासाठी डेपोमध्ये स्वच्छतागृहे, वेटिंग एरिया आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह सुविधा वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना स्थायी सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम, सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी परिवहन मंत्रालय वचनबद्ध राहणार आहे.- प्रताप सरनाईक, राज्य परिवहन मंत्री