नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:37 PM2020-12-31T23:37:05+5:302020-12-31T23:37:15+5:30

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात अडकलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत.

A trainload of tourists to welcome the New Year | नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रेलचेल

Next

निखिल म्हात्रे

अलिबाग :  सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडच्या किनारपट्टीसह धार्मिक स्थळेही सज्ज झाली आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर व महड येथील वरद-विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहावयास मिळते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली आहे. तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग, नागाव, रायवाडी, वरसोली मुरुड आवास आदी ठिकाणच्या हॉटेल्सची बुकिंग एक महिना आधीच फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्या वेळी पर्यटनासाठी  आलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात अडकलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा आता भरून गेला आहे. मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिकस्थळांवर वास्तव्यास आहेत. तर ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ शकते, तसेच त्यांना मनमानी पॅकेज घ्यावे लागू शकते. याचीही काही ठिकाणी आधीच दखल घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक पर्यटनावरच येथे जास्त भर आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, कोशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. साधारण एक ते दीड लाख पर्यटक चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टीला भेट देतात. यात सर्वाधिक पसंती नागाव, मुरुड, काशीद या ठिकाणांना असते. महिनाभर आधीच बहुसंख्य हॉटेलचे बुकिंग फुल्ल झालेले आहे. याआधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज १० हजार रुपये असायचे. मात्र यामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ते बुकही झाले आहेत.
 

छोटीमोठी हॉटेलही हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. अलिबाग, नागाव आक्षी, किहीम, आवास, सासवणे, काशीद, दिव्याआगर, श्रीवर्धन याबरोबरच किनारपट्टीलगतच्या गावांतही निवासव्यवस्था उपलब्ध असून बहुतेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग झाल्याची माहिती आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग असे प्रकार पर्यटकांसाठी यापूर्वीच खुले केले आहेत.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक केटरर्स, खाणावळी यांचीही लगबग सुरू आहे. मोदक, डाळ-भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटणवडे, कोंबडीवडे तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहाराची उपलब्धता करून पर्यटकांची हौस भागविली जाणार  आहे.

Web Title: A trainload of tourists to welcome the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.