राज्य मार्गावरील चौकात वाहतूक बेट !
By Admin | Updated: June 12, 2016 01:02 IST2016-06-12T01:02:04+5:302016-06-12T01:02:04+5:30
पेण-अलिबाग राज्य मार्गावरील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चौकात असुरक्षित वाहतूक व अपघात यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी वाहतूक बेट तयार करणे अनिवार्य आहे.

राज्य मार्गावरील चौकात वाहतूक बेट !
अलिबाग : पेण-अलिबाग राज्य मार्गावरील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चौकात असुरक्षित वाहतूक व अपघात यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी वाहतूक बेट तयार करणे अनिवार्य आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, त्याचबरोबर चौकात वाहतूक नियंत्रणाकरिता सद्य:स्थितीत असलेल्या एका पोलिसाबरोबरच वाहतूक पोलीस शाखेचा पोलीस देण्याकरिता वाहतूक पोलीस शाखेस तत्काळ कळवून कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी चेंढरे ग्रामस्थांना दिला.
केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी लोकमतने वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शनिवारी चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता सुनील प्रधान, जि. प. सदस्या प्रियदर्शिनी पाटील, चेंढरच्या सरपंच शारदा नाईक, उपसरपंच अॅड. परेश देशमुख, माजी सरपंच अॅड. संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत फुलगांवकर, लोकमत अलिबाग कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक समीर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे मोठे औत्सुक्य
- ग्रामस्थांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठीच्या ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत सर्वांनाच मोठे औत्सुक्य होते. परिणामी या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच यतीन घरत, राम पाटील, अनिल थळकर, संजय कवळे, पी. एन. पाडळीकर, प्रदीप शेळके, अशोक धुमाळ, सुभाष गुडदे, सुशीलकुमार चाचे आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्या अत्यंत अभ्यासू पद्धतीने यावेळी मांडल्या.
- लोकमतच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सत्वर सुटणार आहेत. उपक्रम चेंढेरे परिसरात केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे उपसरपंच अॅड. परेश देशमुख यांनी धन्यवाद देऊन कार्यक्रमास मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
बेदरकार दुचाकीस्वारांना हवा लगाम
बेदरकार दुचाकी चालकांच्या समस्येच्या अनुषंगाने बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वराडे म्हणाले, की गेल्या वर्षभरात फक्त अलिबाग परिसरात अशा मोटारसायकल चालकांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
केवळ दंडवसूल करण्याने ही समस्या सुटणार नाही, तर त्याकरिता या मोटारसायकल चालक मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांवर त्यांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने नियंत्रण आणल्यास हा प्रश्न सुटेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
नाल्यांची समस्या सुटणार
ग्रामपंचायत क्षेत्रातील नाल्याची समस्या, सार्वजनिक वीज व्यवस्था, काही रस्त्यांच्या समस्या, पावसाळ््यात मोकळ््या जागेतील खड्ड्यांमध्ये पाणी साचून निर्माण होणारे डास, याबरोबरच बेदरकार मोटारसायकल चालकांची समस्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यांवर असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. नाल्यांचे बांधकाम करण्याकरिता घरमालकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायत सदस्य फुलगांवकर यांनी सांगितले, तर सार्वजनिक वीज व्यवस्था अल्पावधीतच सुयोग्य होत असल्याचे उपसरपंच अॅड. देशमुख यांनी सांगितले. मोकळे खड्डे हे खासगी मालकीच्या जागेत असल्याने तेथे ग्रामपंचायत इच्छा असूनही काही करू शकत नसल्याचे अॅड. संजय पाटील यांनी सांगितले.
वाहतुकीची गंभीर समस्या
पेण-अलिबाग मार्गावरील चौकातील वाहतुकीची गंभीर समस्या यतीन घरत यांनी मांडली, तर याच चौकास जोडणाऱ्या अलिबाग बायपास रोडवरील मोठमोठे बॅनर्स हे अपघातास कारण ठरत असल्याने ते काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी तत्काळ काढण्यात यावेत, अशा मागणी संजय कवळे यांनी केली.
चौकात वाहतूक बेट केल्यास ही समस्या सुटू शकते आणि त्या बेटाचे डिझाइन जनहिताच्या दृष्टीने मोफत करून देण्यास तयार असल्याचे व्यवसायाने वास्तुविशारद असलेले ग्रामस्थ पी. एन. पाडळीकर यांनी सांगितले. वाहतूक बेट तयार करण्यासाठी निधी ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे उपसरपंच अॅड. परेश देशमुख यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनी यांच्यामधील समन्वयाअभावी येथे वाहतूक बेटांचे बांधकाम करता येत नसल्याचे अॅड. संजय पाटील यांनी यावेळी लक्षात आणून दिले. यावर उपाय म्हणजे येथे वाहतूक बेट अत्यावश्यक असल्याचा अहवाल अलिबाग पोलिसांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना गेल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनी या दोन्ही शासकीय यंत्रणा हा विषय गाभीर्याने घेऊन हा प्रश्न मार्गी लागू शकतात, असा विश्वास ग्रामपंचायत सदस्य प्रशांत फुलगांवकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम सुरू असतानाच विद्यानगर परिसरात तुटलेल्या वीज वाहिनीचे काम करणारे दोन कर्मचारी अपघात होऊन जखमी झाल्याने वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता सुनील प्रधान यांना तत्काळ कार्यक्रम सोडून घटनास्थळी जावे लागले. परंतु या वाहतूक बेटाच्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती घेतली असता, चौकातील वीज वितरण कंपनीचे सुमारे १८ खांब इतरत्र स्थलांतरित करावे लागणार आहेत. हा प्रश्न वरिष्ठ कार्यालयाकडे असल्याची माहिती प्रधान यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अलिबाग-पेण रस्त्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या अनधिकृत टपऱ्या दूर करण्याचे काम ग्रामपंचायतीला करता येत नाही. अनेकदा सांगूनही कारवाई करीत नसल्याचे मत माजी सरपंच अॅड. संजय पाटील यांनी व्यक्त केली.