वाहतूक कोंडीने म्हसळेकर हैराण
By Admin | Updated: November 7, 2016 02:54 IST2016-11-07T02:54:49+5:302016-11-07T02:54:49+5:30
दिवाळीच्या सुटीमुळे श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची वाढलेली वाहने, दुचाकी, रिक्षा, खाजगी वाहने, मालवाहू ट्रक, एसटी बसेस, मिनीडोर अशा वाहनांच्या

वाहतूक कोंडीने म्हसळेकर हैराण
म्हसळा : दिवाळीच्या सुटीमुळे श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची वाढलेली वाहने, दुचाकी, रिक्षा, खाजगी वाहने, मालवाहू ट्रक, एसटी बसेस, मिनीडोर अशा वाहनांच्या वाहतुकीसाठी म्हसळा शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते वाहतुकीला अपुरे पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार म्हसळेकरांसाठी नित्याचा झाला आहे. यामुळे म्हसळेकर त्रस्त झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
म्हसळा शहराचे झपाट्याने शहरीकरण होत असताना वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक जटील होत आहे. शहरात वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून चालक वाहन चालवितात. बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला असून नागरिकांना चालणे सुद्धा जिकिरीचे झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी तयार करण्यात आलेला बाह्य वळण रस्ता खड्ड्यात हरवल्याने पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे बाह्य वळण रस्त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. म्हसळा पोलिसांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
म्हसळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्यातील ८३ गावे व शेजारी तालुक्यांमधून नागरिक बाजारहाटासाठी येथे येतात . शहराची लोकसंख्या दहा हजारच्या घरात असून शहराचा कारभार सध्या नगरपंचायत पाहत आहे. म्हसळा शहर व बाजारपेठेतून माणगाव - श्रीवर्धन हा मुख्य राज्य मार्ग जातो. यामुळे रस्त्यावर मालवाहू ट्रक, एसटीच्या फेऱ्या, चारचाकी, रिक्षा, मिनीडोर, दुचाकी, टेम्पो पर्यटकांच्या शेकडो वाहनांची दिवसभर रेलचेल असते. शहरातील मार्गावर धावणारे वाहनांची संख्या वाढली आहे, मात्र रस्त्यांची रुंदी दिवसेंदिवस कमी होत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावर वाहनाची गर्दी होते. यामुळे बाजारपेठ, दिघी रोड, सोनार आळी, एसटी स्टँड, पोलीस ठाणे, साने मोहल्ला येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते.
वाहनचालकांकडून शिस्तभंगामुळे व नियमांची पायमल्ली होत आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या बेताल वाहतुकीमुळे शहरात वाहनांच्या रांगा लागत असल्याने वर्दळीकरिता रस्ताच शिल्लक नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)