कर्जतमध्ये आज फातिमामातेची यात्रा
By Admin | Updated: October 16, 2016 03:24 IST2016-10-16T03:24:29+5:302016-10-16T03:24:29+5:30
कर्जतमधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर (चर्च) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी

कर्जतमध्ये आज फातिमामातेची यात्रा
- विजय मांडे, कर्जत
कर्जतमधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर (चर्च) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. पूर्वी रेल्वे सेवेच्या फेऱ्या कमी होत्या त्यावेळी मध्य रेल्वे कडून काही विशेष गाड्या मुंबईहून कर्जतसाठी सोडण्यात येत असत. विशेष म्हणजे राज्यातील नव्हे तर देश परदेशातूनही ख्रिश्चन बांधव या यात्रेसाठी आवर्जून येतात. या रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ही तीर्थयात्रा असल्याने सध्या यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे.
१९२० साली फातिमा माऊलीचा पुतळा पोर्तुगाल देशातील लिस्बन शहरापासून ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या फातिमा नावाच्या छोट्या खेडेगावातून कर्जतमध्ये आणला. कर्जत रेल्वे स्थानका नजिकच्या प्रार्थना मंदिरामध्ये ठेवण्यात आला. याबाबतची अख्यायिका अशी आहे की, १३ मे १९१७ रोजी फातिमा गावातील जेसिंटा, फ्रांसिस व लुसिया ही तीन बालके आसपासच्या परिसरात आपली मेंढरे चारत असतांना पवित्र मरिया माऊलीने त्यांना दर्शन दिले. पुढील जुन, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या पाच महिन्यात प्रत्येक १३ तारखेला याच तीन बालकांना मरिया माऊलीने पुन्हा दर्शन दिले व जगातील प्रत्येक मनुष्य पापापासून कसा वाचिवला जाईल व त्याला स्वर्गीय वैभव कसे प्राप्त होईल हा संदेश दिला. मरिया माऊलीने फातिमा गावात दर्शन दिल्याने तिला फातिमा हे नाव दिले.
१९७ साली शेवटचे दर्शन १३ आॅक्टोबरला दिल्याने दरवर्षी १३आॅक्टोबरला रविवार आल्यास किंवा त्यानंतर येणाऱ्या रविवारी फातिमा माऊलीची तीर्थयात्रा कर्जतमध्ये भरते.यावेळी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांसह महाराष्ट्रातून तसेच देश परदेशातून ख्रिश्चन धर्मिय बांधव फातिमा मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात व कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात फिरून मौज मजाही करतात. या तीर्थयात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील आदिवासी बांधव स्वत: पिकवलेल्या काकड्या चर्चच्या परिसरात आणून विक्रीसाठी ठेवतात. विशेष म्हणजे अन्य धर्मिय सुद्धा आपला नवस फेडण्यासाठी येथे उपस्थित असतात.
कर्जतकरांचे फातिमामातेशी नाते
कर्जत व फातिमा मातेचे नाते अगदी घट्ट आहे त्याचे कारण असे कि, श्रीमंत चिमाजी अप्पांनी वसई वर मोहीम आखली त्यावेळी वसई पंचक्रोशीत जी चर्च होती त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला त्या मोहिमेत काही चर्चचे मनोरे ढासळून गेले, काही चर्चच्या मनोऱ्यावरून मोठ मोठ्या घंटा आणण्यात आल्या त्यातील एक भली मोठी घंटा कर्जत मार्गे भीमाशंकरच्या शिखरावर नेली व नाना फडणविसांनी भीमाशंकराच्या हेमाडपंथी मंदिरात ती बसविली. या घंटेवर पवित्र मरिया माऊलीची छोटीशी मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे १७४० च्या सुमारासच मरिया माऊलीचे कर्जतशी नाते जुळले आहे.