रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 01:31 IST2016-06-06T01:31:34+5:302016-06-06T01:31:34+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा ३४२ वा स्मृतिदिन सोमवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार असून रविवारी सायंकाळपर्यंत

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन
महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा ३४२ वा स्मृतिदिन सोमवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार असून रविवारी सायंकाळपर्यंत गडावर राज्यभरातून सुमारे चाळीस हजारहून अधिक शिवभक्त दाखल झाले आहेत.
रविवारी सकाळपासून गडाकडे जाणारा रस्ता शिवभक्तांनी गजबजलेला पहायला मिळाला. भगवे झेंडे लावलेल्या वाहनांच्या या मार्गावर रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या सोहळ्यात गडावर एक लाखाहून अधिक शिवभक्त हजेरी लावतील असा अंदाज या सोहळ्याचे आयोजक असलेल्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीकडून व्यक्त केला जात आहे.
या सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणेसह स्थानिक प्रशासन सज्ज असून सोमवारी स. ८.४० वा. मुख्यमंत्र्यांचे गडावर आगमन होणार आहे. छत्रपतींचे वंशज युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली या निमित्त दोन दिवस रायगडावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी सायंकाळी युवराज संभाजीराजे यांचे चित्रदरवाजा येथे आगमन झाले. त्यानंतर ते आपल्या शेकडो शिवभक्तांसह गडावर पायी चढून दाखल झाले. रविवारी सायंकाळी गडपूजनाने या सोहळ्यात प्रारंभ झाला. देवीचा गोंधळ, धार्मिक पूजा आरती, तसेच रात्री शिवशाहीर दिलीप सावंत (कोल्हापूर), सुरेश जाधव (औरंगाबाद) यांची शाहिरीची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. ६ जूनला पहाटे ५.३० वा. जगदीश्वर पूजन, ध्वजारोहण, शाहिरी मुजरा, त्यानंतर छत्रपती घराण्याच्या पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवप्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर शिवजय घोषित ढोलताशाच्या गजरात शिवप्रतिमेची शिवकालीन वेषभूषेतील मावळ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. (वार्ताहर)