संगणक गहाळ प्रकरणी तिसरी नोटीस
By Admin | Updated: April 28, 2017 00:23 IST2017-04-28T00:23:49+5:302017-04-28T00:23:49+5:30
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयातून संगणक संच गेल्या चार वर्षांपासून गहाळ झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे,

संगणक गहाळ प्रकरणी तिसरी नोटीस
कर्जत : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयातून संगणक संच गेल्या चार वर्षांपासून गहाळ झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे, परंतु एवढी मोठी घटना घडूनही गटशिक्षणाधिकारी हे फारसे गंभीर नसल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. याची दखल घेऊन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या तत्कालीन वरिष्ठ साहाय्यक मीनल साळवी-आंभोरे यांना तिसरी व अंतिम नोटीस बजावली आहे.
चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून संगणक गहाळ झाल्याची चर्चा होती. याबाबत दोन महिन्यांपूर्वी कर्जतमधील दिगंबर चंदने यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागातील संगणक संच पंचायत समिती वरिष्ठ साहाय्यक मीनल साळवी-आंभोरे यांनी दुरु स्तीला दिला आहे असे पंचायत समिती, शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला चार वर्षांचा कालावधी झाला आहे तरी या संगणक आजपर्यंत कार्यालयात परत आलेला नाही त्याची नोंदही या कार्यालयात नाही. त्यामुळे हा संगणक दुरु स्तीला दिला किंवा संबंधित व्यक्तीने आपल्या घरी नेला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. एखाद्या शासकीय कार्यालयातील संगणक संच दुरु स्तीला दिल्यास त्याची नोंद कार्यालयात ठेवणे गरजेचे असताना मीनल साळवी-आंभोरे यांनी नोंद न ठेवल्याने त्यांच्या या संगणक दुरु स्तीबाबत संशय निर्माण होत आहे.
याबाबतची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मीनल साळवी-आंभोरे यांना २० एप्रिल रोजी तिसरी व अंतिम नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तुम्ही कार्यालयातील संगणक दुरु स्तीसाठी दिलेला संच आजतागायत प्राप्त न झाल्याबाबत व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या गहाळ झालेल्या मूळसेवा पुस्तकांबाबत वरील तीन नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याबाबत तुम्ही समर्पक खुलासा सादर न केल्याने तुमचे खुलासे अमान्य करण्यात आले आहेत. या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक साळवी-अंभोरे यांना आणखी एक नोटीस बजावली
आहे.