अलिबाग शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, 32 ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

By राजेश भोस्तेकर | Published: October 31, 2023 07:23 PM2023-10-31T19:23:42+5:302023-10-31T19:23:55+5:30

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर ठरत आहे.

Third eye on Alibag city now, CCTV cameras will be installed at 32 places | अलिबाग शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, 32 ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, 32 ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग: वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी अलिबाग शहरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीमधून ३ कोटी १० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह माजी नगरसेवक अनिल चोपडा,नगरपरिषद कर्मचारी यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांची मंगळवारी ३१ ऑक्टोंबर रोजी पाहणी केली. त्यामुळे लवकरच अलिबाग शहर हे तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत राहणार आहे.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर ठरत आहे. समुद्रकिनारा, कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी पर्यटकांना कायमच भुरळ घालत आली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर आठवड्याला दहा हजारपेक्षा अधिक पर्यटक अलिबागमध्ये येतात. येथील पर्यटन स्थळांचा आनंद घेतात. तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढत आहे.

शहरामध्ये वेगवेगळ्या विभागाचे जिल्हा, तालुका कार्यालये आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. याठिकाणी हजारोंच्या संख्येने कर्मचारी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अलिबाग शहर मुंबईच्या अगदी जवळ असल्याने सागरी मार्गाने अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

अलिबाग शहरात 32 ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यावर अलिबाग पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष  यांचे नियंत्रण राहणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी मंगळवारी दुपारी शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक जागांची पाहणी केली. त्यामुळे लवकरच शहरातील संशयीत हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे नजर राहणार आहे.

Web Title: Third eye on Alibag city now, CCTV cameras will be installed at 32 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.