महाडमध्ये पावसाची दमदार हजेरी
By Admin | Updated: June 20, 2016 02:25 IST2016-06-20T02:25:30+5:302016-06-20T02:25:30+5:30
रविवारपासून जवळपास संपूर्ण महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बरेच दिवस चिंतेत असलेल्या बळीराजाची चिंता दूर झाली आहे.

महाडमध्ये पावसाची दमदार हजेरी
दासगाव : रविवारपासून जवळपास संपूर्ण महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बरेच दिवस चिंतेत असलेल्या बळीराजाची चिंता दूर झाली आहे. मात्र या पावसामुळे महाड तालुक्यातील पाणी प्रश्न सुटला नसला तरी मात्र नागरिकांना गरमीपासून सुटका व शेतकऱ्यांना या पावसापासून दिलासा मिळाला आहे.
जून महिन्याचे १५ दिवस कोरडे गेले. या महिन्यामध्ये एक ते दोन दिवस पावसाने थोडी थोडी हजेरी लावत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना चिंतेत टाकले होते. सकाळपासून जवळपास संपूर्ण महाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत पावसाच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता सध्या तरी दूर केली आहे. दरवर्षी जूनच्या सुरुवातीला किंवा आठवड्यातच पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा जूनचे १५ दिवस पाऊस लागलाच नाही. मधल्या काळात पहिल्या आठवड्यात एक दिवस थोड्या पावसाने हजेरी लावली व गायब झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भाताला कोंब आले व तो कपरटण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकरी चिंतेत होता, पुन्हा पेरणीस भात आणायचे कोठून? अचानक काल रविवारी सकाळपासूनच महाडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने मात्र तरव्यांना आवश्यक एवढा पाऊस पडल्याने सध्या तरी या लागणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.
यंदा एप्रिलपासूनच संपूर्ण राज्यात गरमीचा पारा चढला होता. महाड तालुक्यातील जनता या चढलेल्या पाऱ्याच्या गरमीने बेहाल होती. या गरमीने नागरिकांना हैराण करून सोडले होते. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाणी प्रश्न अद्याप कायम आहे. पावसामुळे शहरातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचले होते.
महाड तालुक्यात ६० टक्के गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमच आहे. गरमीपासून सुटका मिळाली असून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, मात्र पाणीटंचाईचा प्रश्न्र आहे, अशी परिस्थिती पाऊस लागला तरी कायम राहणार आहे. (वार्ताहर)