विठ्ठलनगर परिसरात दोन दिवस पाणी नाही!
By Admin | Updated: April 17, 2017 04:33 IST2017-04-17T04:33:37+5:302017-04-17T04:33:37+5:30
नगरपरिषद हद्दीत संपूर्ण विठ्ठलनगर आणि कोतवालनगरच्या काही परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आॅप्टिकल फायबर केबल टाकताना तुटली

विठ्ठलनगर परिसरात दोन दिवस पाणी नाही!
कर्जत : नगरपरिषद हद्दीत संपूर्ण विठ्ठलनगर आणि कोतवालनगरच्या काही परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आॅप्टिकल फायबर केबल टाकताना तुटली. त्यामुळे दोन दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांचे हाल झाले.
कर्जत शहरातील अभिनव ज्ञानमंदिर शाळा या रस्त्यावर आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना रस्ता खोदण्यात आला असून, रस्त्याच्या या बाजूकडून दुसऱ्या बाजूला केबल नेण्यासाठी ड्रील मारून ही केबल पलीकडे टाकली जाते. मात्र, या संबंधित यंत्रणेने नगरपरिषद किंवा अन्य कोणाला विचारात न घेतल्याने केबल टाकण्यासाठी ड्रील मारले व त्यामधून केबल टाकली. सकाळी जेव्हा नगरपरिषदेने पाणी सोडले त्यावेळी या रस्त्यावर पाणीच पाणी झाले. पाणी साठलेल्या ठिकाणी खोदकाम केल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पाच इंचाच्या जलवाहिनीमधून दोन आॅप्टिकल फायबर केबल गेल्या होत्या, त्यामुळे ही जलवाहिनी तुटली होती. ही घटना १३ एप्रिल रोजी घडली. या पाच इंचांच्या जलवाहिनीला दुसरा तुकडा जोडण्यासाठी नगरपरिषदेकडे पाच इंचांची जलवाहिनी नसल्यामुळे केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर ही जबाबदारी टाकली. मात्र, ही पाच इंचांची जलवाहिनी कुठे मिळत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी गेला. या दोन दिवसांत १४ आणि १५ एप्रिलला विठ्ठलनगर व कोतवालनगरमधील काही भागांतील नागरिकांची खूपच गैरसोय झाली. हे केबल टाकण्याचे काम केंद्र सरकारचे असल्याने प्रत्यक्ष केबल टाकताना नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीची परवानगी बंधनकारक नाही किंवा रस्ता खोदण्याचे पैसे भरणे बंधनकारक नाही, असे परिपत्रक नगरपरिषदकडे असल्याने नगरपरिषद प्रशासन गप्प आहे. (वार्ताहर)