उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका
By निखिल म्हात्रे | Updated: May 3, 2024 14:18 IST2024-05-03T14:17:41+5:302024-05-03T14:18:18+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे

उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका
अलिबाग : येथील ४५ वर्षे जुन्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणी कमी अन् गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गाळ काढला जात नसल्यामुळे आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून विविध प्रकारच्या जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत हद्दीतील ४५ गावांतील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणाने तळ गाठला आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील हजारो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणी
धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी कपातीचे संकट सुरू झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून या पाणी कपातीत वाढ करण्यात आली आहे. अनेक गावे, वाड्यांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून हजारो नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
लोकांच्या डोक्यातील राजकीय गुलामीचा गाळ निघत नाही तोपर्यंत उमटे धरण आणि त्यातील गाळ तसाच राहणार आहे. आम्ही २०१६ पासून आजपर्यंत या विषयावर अर्ज, तक्रारी करीत आहोत. उमटे धरणाच्या गाळाच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ लोकांवर येणे हे राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अपयश आहे.- ॲड. राकेश पाटील, उमटे धरण आंदोलनकर्ते