ठाकूरवाडी रस्ता कागदावरच!
By Admin | Updated: June 22, 2016 02:06 IST2016-06-22T02:06:26+5:302016-06-22T02:06:26+5:30
कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी ते आषाणे रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता भलत्याच रस्त्याचे काम दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची

ठाकूरवाडी रस्ता कागदावरच!
कांता हाबळे, नेरळ
कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी ते आषाणे रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता भलत्याच रस्त्याचे काम दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची तक्रर सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे. सुमारे ६० लाखांच्या शासकीय निधीचा
दुरुपयोग करून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते गो. रा. चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.
आषाणे ते ठाकूरवाडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक व नकाशे यास अधीक्षक अभियंता रायगड यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी कामाचे कार्यारंभ आदेश २८ फेब्रुवारीला निर्गमित केले. या कामाची निविदा ठाणे येथील सिद्धिनाथ कन्स्ट्रक्शन यांना मिळाल्या असून त्यांनी निविदेप्रमाणे काम न करताही मंजूर नसलेल्या कामासाठी त्यांना देयके अदा केली आहेत. मंजुरी आदेशाप्रमाणे ठाकूरवाडी रस्त्याचे काम न करता नेरळ -कर्जत रस्त्यापासून आषाणेपर्यंतचे केवळ ५६० मीटर अंतरापर्यंतचे काम केले आहे.
प्रत्यक्षात ठाकूरवाडी ही आदिवासी वस्ती डोंगर माथ्यावर १,६१० मी. (साधारणत: पावणे दोन किमी ) इतक्या अंतरावर आहे. आदिवासींना विकासाचा रस्ता मोकळा व्हावा या हेतूने शासनाने तेराव्या वित्त आयोगातून ही मंजुरी दिली.
या तक्र ार अर्जातील गंभीर बाब म्हणजे मंजूर रस्त्याची संपूर्ण जमीन वन जमीन क्षेत्रातील असून मान्यता आदेशातील सहाव्या अटीनुसार भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. परंतु भूसंपादनाची डोकेदुखी नको असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचा उपयोग करत निधी खर्च केला. त्यामुळे या कामाची दक्षता पथक, मुंबई यांच्याकडून चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कार्यकारी अधिकारी आर. एस. मोरे यांनी यासंदर्भात उप अभियंता यांच्याकडे विचारणा करा, असे सांगितले.
शासनाचा आषाणे ते ठाकूरवाडी असा ६० लाखांचा रस्ता मंजूर असताना बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी ठेकेदाराशी संगनमत करून जुनाच रस्ता दुरु स्त केला व याच रस्त्यावर ६० लाख खर्च दाखवला आहे. मुख्य रस्त्यापासून आषाणे गावापर्यंतच्या ६५० मी. रस्त्याच्या कामाचा हा खर्च दाखवला आहे.
- गो.रा. चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ते, डिकसळ