शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:54 IST2019-06-03T23:54:35+5:302019-06-03T23:54:40+5:30

२ लाख ३० हजार ७४१ विद्यार्थी : ११ लाख ३५ हजार पुस्तकांचे होणार मोफत वाटप

Textbooks will be available on the first day of school | शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

अलिबाग : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तीन हजार २७१ शाळांतील एकूण दोन लाख ३० हजार ७४१ विद्यार्थ्यांना १७ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ११ लाख ३५ हजार पुस्तके मोफत देण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी दिली आहे.

कोणत्याही बालकाचे शिक्षण हे पुस्तकाअभावी वंचित राहू नये, तसेच सर्व शाळा दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. रायगड जिल्ह्यातील तीन हजार २७१ शाळांना या योजनेचा लाभ होणार आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती व इंग्रजी या माध्यमांतील शाळांचा समावेश असल्याचे दराडे यांनी सांगितले. पुस्तकांच्या वाहतुकीसाठी विभागीय पाठ्यपुस्तक भांडार पनवेल ते तालुकास्तरापर्यंत पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने वाहतूकदार निश्चित केले आहेत. तालुकास्तर ते शाळास्तरापर्यंतची वाहतूक ही संबंधित तालुकास्तरावरून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. संपर्कपदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ जून या दिवशी पुस्तके मोफत देण्यात येतील, असे दराडे यांनी सांगितले.

Web Title: Textbooks will be available on the first day of school