जिल्ह्यात चार अपघातांत १० जखमी

By Admin | Updated: May 7, 2017 06:20 IST2017-05-07T06:20:56+5:302017-05-07T06:20:56+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी झालेल्या चार विविध अपघातांत, एकूण १० जण जखमी झाले आहेत. तर बेदरकार वाहन चालवून

Ten injured in four accidents in the district | जिल्ह्यात चार अपघातांत १० जखमी

जिल्ह्यात चार अपघातांत १० जखमी

जयंत धुळप/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी झालेल्या चार विविध अपघातांत, एकूण १० जण जखमी झाले आहेत. तर बेदरकार वाहन चालवून वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी ९६ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून १८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बेदरकार वाहनचालकांना आळा घालण्याकरिता जिल्हा वाहतूक शाखेस सक्त कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
पाली-सुधागड तालुक्यांतील पाच्छापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७च्या सुमारास भरधाव सफारी गाडी (एमएच-०६/बीसी-२०२१)ने एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात, रघुनाथ कुशा शिंदे (४२), मनीषा रघुनाथ शिंदे(३५), राजश्री नंदकुमार शिर्के (३०), स्मिता अंकुर करंजे (२५), पारस रघुनाथ शिंदे (६) आणि हर्ष नंदकुमार शिर्के (५) हे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी पाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पाली तालुक्यातच शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता वावलोळी (ता. सुधागड) जवळच्या चिवेफाटा गावाच्या हद्दीत दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच-०६/सीएच-१५६८) ठोकर दिल्याने अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार व त्यांच्या सोबतचे चंद्रकांत धर्मा येलवे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सानपाडा येथील सूरज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी तिसरा अपघात सकाळी ८.३० वाजता पोलादपूर जवळच्या गांजवणे गावच्या हद्दीत झाला. समोरून येणाऱ्या सुमो (एमएच-०६/डब्ल्यू-१०७१)ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला पोलादपूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी चौथा अपघात सकाळी ७.५० वाजता नागोठणे येथे मॅजिक गाडीने (एमएच-०६/बीई-३६८५) पादचारी दिलीप पीतांबर शर्मा यांना ठोकर दिली. या अपघातात पादचारी दिलीप पीतांबर शर्मा हे जखमी झाले असून, त्यांच्यावर पनवेल येथील पॅनासिया रुग्णालयात उपचार चालू आहेत.

महामार्गावर महिला जखमी
मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता भरधाव मारु ती इको (एमएच-४६/एडी-१६६०)ने लोधिवली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडणारी पादचारी महिला शानी नकुल कातकरी (रा. सारंग आदिवासीवाडी, ता.खालापूर) हिला ठोकर मारली. अपघातात जखमी झालेल्या कातकरी यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माथेरान घाटात गाडीला अपघात

माथेरान : माथेरान घाट रस्त्यात इर्टिगा कारचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी दुपारी माथेरानच्या वॉटर पाइप स्थानकाच्या वरच्या बाजूला असलेल्या गटारात कार पडल्याने अपघात झाला.
ही गाडी माथेरानहून नेरळकडे जात असताना, चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सरळ कठडा तोडून गटारात पलटी झाली. या गाडीमध्ये ३ प्रवासी बसले होते. तिघेही मुंबई-बांद्रा येथील असून, त्यांस किरकोळ जखमा झाल्या आहेत.
रस्त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८ कोटी रुपये मंजूर करून त्यांच्या निविदा देऊनदेखील आजतागायत हा रस्ता सु स्थितीत केला नसल्याने रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला, असा आरोप येथील टॅक्सीचालक-मालक संघटनेने केला आहे.

Web Title: Ten injured in four accidents in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.