माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:17 AM2020-06-26T00:17:57+5:302020-06-26T00:18:02+5:30

किमान आठवड्यातून तीन दिवस मालवाहतुकीच्या टेम्पोला परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.

Tempola one day permission for gas transport in Matheran | माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी

माथेरानमध्ये गॅस वाहतुकीसाठी टेम्पोला एक दिवस परवानगी

Next

मुकुंद रांजणे
माथेरान : पूर्वीपासूनच वाहतुकीच्या गहन समस्येत गुरफटलेल्या माथेरानमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार खूपच उशिराने का होईना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दस्तुरीपासून माथेरानपर्यंत टेम्पोला गॅस वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माथेरानला आठवड्यातून तीन दिवस टेम्पो वाहतुकीचे आदेश दिले आहेत. तरीदेखील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केवळ एकच दिवस तेसुद्धा गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. येथे नियमितपणे आठवड्याला २४० ते २५० गॅस सिलिंडरची गरज आहे. एका टेम्पोत ७० ते ८० टाक्या येऊ शकतात, त्यामुळे बाकी टाक्यांसाठी पुन्हा मालवाहू घोड्यांचा वापर करावा लागेल व १०० ते १५० रुपये जास्त द्यावे लागतील. हे नागरिकांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे किमान आठवड्यातून तीन दिवस मालवाहतुकीच्या टेम्पोला परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १६ मे रोजी दिलेल्या निकालानुसार आठवड्यातून तीन वेळा माथेरानमध्ये गॅस सिलिंडरसाठी परवानगी देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. एकीकडे या गावावर पूर्वीपासून असलेले ब्रिटिशकालीन जाचक नियम व अटीचे निर्बंध घातले गेले आहेत. राज्यात नव्हे तर देशात असे हे एकमेव पर्यटनस्थळ असावे की जे आजही वाहतुकीच्या गहन समस्येत गुरफटून गेले आहे. गाव तिथे रस्ता हे शासनाचे घोषवाक्य असताना येथे आजही मानवचलित हातगाडीवर सामानाची वाहतूक केली जात आहे. शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना या विकासापासून दूर असलेल्या गावात कुठल्याही प्रकारची सोयीस्कर आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही.
सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असून येथील सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी टेम्पोशिवाय पर्याय नाही. मात्र परवानगीमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, आठवड्यातून फक्त एक दिवस तेही गॅस वाहतुकीसाठी परवानगी, अन्य सामानाच्या वाहतुकीसाठी ट्रेनच्या मालगाडीमधून वाहतूक करण्यात यावी; परंतु जगात कुठेही नाही अशा प्रकारे काही दिवसांपूर्वी मालगाडी सुरू करण्यात आली होती की ज्या गाडीत पाच प्रवासी बोगी अन् दोन बंद मालाच्या बोगी आहेत. त्यामुळे त्या गाडीतून वाहतूक करताना खूपच त्रासदायक आणि खर्चीक बाब बनली होती. ही मालवाहतूक गाडी रेल्वेने ३ जूनपासून बंद केली आहे.
>न्यायालयात याचिका दाखल
माथेरानच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडण्याच्या दृष्टीने हे पहिले ऐतिहासिक पाऊल आहे. नुकत्याच झालेल्या न्यायालयातील सुनावणी दरम्यान वकील गौरव पारकर यांनी फार प्रभावीरीत्या वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली व घोड्यांचा जीव धोक्यात घालून गॅसची वाहतूक करावी लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. उशिरा का होईना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी टेम्पोला परवानगी दिली आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक व्यवस्था बदलण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार सुरेशभाऊ लाड व अजय सावंत यांनी याचिका दाखल केल्याने या बदलाला सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे प्राणीप्रेमी सुमी कुंजू सुब्रमण्यम यांनी अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड नवी दिल्ली यांच्या माध्यमातून गॅस टाक्यांची घोड्यांवरून होणारी वाहतूक थांबवावी या पाठपुराव्याचाही फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी दिली.निदान माथेरानमधील एकंदरीतच भौगोलिक परिस्थितीचा साधकबाधक विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस टेम्पोला परवानगी देणे आवश्यक आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

Web Title: Tempola one day permission for gas transport in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.