A teacher who was sexually assaulted | लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक
लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक

माणगाव : ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकाच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करून शिक्षणासारखे क्षेत्र बदनाम करीत आहेत. माणगाव तालुक्यातील फलाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचे लौंगिक शोषण केल्याने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
माणगाव तालुक्यातीत फलाणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नित्यानंद धोंडू पाटील (५०, रा. कावेरी अपार्टमेंट, गोरेगाव) हा दहा ते अकरा वर्षांच्या दोन मुलींचे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता. या शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षिकेजवळ या प्रकाराबाबत या दोन विद्यार्थिनींनी वाच्यता केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पालकांना व ग्रामस्थांना हा प्रकार कळल्यावर ग्रामस्थांनी नित्यानंद पाटील आणि शिक्षिके ला फलाणी येथे बोलावून घेतले. दम देताच नित्यानंद पाटील याने आपल्या विकृतीची कबुली देऊन आपण हे कृत्य केल्याचा जबाब दिला. ग्रामस्थांनी या शिक्षकाला चोप देऊन गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पाटील विरोधात पोस्को तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा १९८९ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


Web Title: A teacher who was sexually assaulted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.