Tambadmal village in Sudhagad in the dark; Anger fueled by the light of the festival | सुधागडमधील तांबडमाळ गाव अंधारात; ऐन सणात बत्ती गुल झाल्याने संताप
सुधागडमधील तांबडमाळ गाव अंधारात; ऐन सणात बत्ती गुल झाल्याने संताप

पाली : सुधागड तालुक्यातील महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून घोटावडे ग्रामपंचायतीतील तांबडमाळ गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
५ आॅक्टोबर रोजी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे तांबडमाळ येथील दोन विद्युत खांब पडले होते. विद्युत खांब पडून घरांवर जिवंत विद्युत तारा पडल्या; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. धोकादायक झालेल्या विद्युत खांबांबाबत अनेकदा तक्रार देण्यात आली होती. महावितरणकडे तक्रारी करून दुर्लक्ष केले गेले. अखेर ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास जोराच्या वाऱ्यामध्ये विद्युत खांब कोसळले, तेव्हापासून आजतागायत तांबडमाळ ग्रामस्थ अंधारात आहेत.
महावितरण तांबडमाळ ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप ग्रामस्थ करत आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे गेल्या चार दिवसांपासून विजेअभावी अंधारातच राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून संपर्क केला असता, वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, चार दिवस होऊनही याकडे कोणीच फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title:  Tambadmal village in Sudhagad in the dark; Anger fueled by the light of the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.