खाकी वर्दीची अशीही सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:14 IST2019-04-11T23:14:36+5:302019-04-11T23:14:42+5:30
हरवलेल्या मुलाचा शोध : दिघी सागरी पोलिसांनी घडवली मायलेकाची भेट

खाकी वर्दीची अशीही सेवा
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी हरवलेल्या मुलाची काही तासांतच त्याच्या आईशी भेट घडवून दिली आहे.
कार्ले अदिवासीवाडीवरील राहणाऱ्या सुगंधा सूर्यकांत हिलम या दिवेआगर नजीक आंबा बागायतीत नोकरी करत आहेत. त्या बुधवारी खरेदीसाठी सकाळी १० वा. दरम्यान बोर्लीपंचतन येथे गेल्या असताना घरी परतल्यावर आपला अडीच वर्षांचा मुलगा सौगंध सूर्यकांत हिलम नसल्याने घाबरून गेल्या. रोजगार मिळवण्यासाठी भटकंती करणाºया आदिवासी कुटुंबातील मुलगा अचानक हरवला. शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने सुगंधा यांनी पोलीस ठाणे गाठले.
दिघी सागरी पोलिसांकडे याची तक्रार येताच सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार संतोष जाधव, तसेच गस्तीवरील स्टाफ पो. ना. विनायक पाटील, के. एन. बठारे, पो.शि. ए. ए. सावंत यांना तत्काळ सूचना मिळताच श्रीवर्धन-शेखाडी रस्त्याला शोध सुरू केला. भरडखोल गावापुढे शोध घेत असताना शेखाडी येथे चौकशी दरम्यान दाम्पत्याकडून माहिती मिळाली व मुलाचा शोध लागला. विचारणा केली असता रडून गोंधळलेल्या मुलाला पत्ता काही सांगता येईना. त्याला भरडखोल येथे आणण्यात आले.
पोलिसांनी आईची व मुलाची ओळख पटवून काही तासांतच मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. खेळता खेळता मुलगा वाट हरवला होता. दिघी सागरी पोलिसांच्या या माणुसकीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.