Student's finger broken in school accident | शाळेतील अपघातात विद्यार्थ्याचे बोट तुटले
शाळेतील अपघातात विद्यार्थ्याचे बोट तुटले

नेरळ : खासगी शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जात असल्याची घटना समोर आली आहे. वर्गखोलीच्या दरवाजात अडकून एका विद्यार्थ्याचे बोट तुटले; परंतु शाळेने याबाबत पालकांना न सांगता प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्याला घरी पाठवले. आपल्या मुलाच्या बोटातून एवढे रक्त का जात आहे, हे न समजल्यामुळे आईने डॉक्टरकडे जाऊन बोटांची पट्टी उघडली तर आईला धक्काच बसला. कारण मुलाच्या बोटाचा तुकडा पडला होता. हा प्रकार घडला आहे नेरळ येथील नामांकित हाजी मोहम्मद हनीफ शैक्षणिक संस्थेच्या हाजी लियाकत इंग्लिश हायस्कूलमध्ये.


विराज ठक्कर हा १२ वर्षीय मुलगा इयत्ता सहावीत शिकत आहे. विराजचे वडील किरीट ठक्कर हे ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतात. तर आई दिव्या ठक्कर गृहिणी आहेत. ६ डिसेंबर रोजी हाजी लियाकत शाळेत क्रीडा स्पर्धा होत्या. दुपारी १२ च्या सुमारास विराज वर्गखोलीच्या दरवाजात उभा असताना अचानक दरवाजा लागला. तो फटका एवढा जोरात बसला की त्यात विराजच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या तुकडा पडला. दरवाजाला रोधक (स्टॉपर) नसल्याने ही घटना घडली. वेदनेने विराजची किंकाळी फोडताच शिक्षक धावत आले. त्यांनी विराजला तत्काळ नेरळ येथील डॉ. महेश शिरसाट यांच्या दवाखान्यात नेले. मात्र, या वेळी शाळेकडून विराजच्या पालकांना कळवण्यात आले नाही. प्रथमोपचार करून विराजला परत शाळेत नेण्यात आले आणि त्यानंतर त्याला घेऊन शिक्षक घरी गेले व फक्त नख तुटल्याचे सांगितले; परंतु संध्याकाळी विराजच्या करंगळीची पट्टी रक्ताने भरली. तेव्हा आई त्याला पुन्हा दवाखान्यात घेऊन गेली. या वेळी पट्टी काढली असता, त्यांना धक्काच बसला. विराजच्या करंगळीचा वरच्या भागाचा तुकडा पडला होता.

डॉ. राठोड यांनीदेखील विराजची जखम पाहून तत्काळ पुढे हलवण्याचा सल्ला दिला. विराजच्या वडिलांना बोलावून ठक्कर दाम्पत्यांनी ठाणे येथील नोबेल रुग्णालय गाठले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. ठक्कर कुटुंबियांनी शनिवारी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
एवढा मोठा अपघात होऊनही शाळेतील शिक्षक व प्रशासनाने न कळवल्याने पालकवर्गांत संताप व्यक्त होत आहे. विराजच्या तुटलेल्या करंगळीचा तुकडा मिळाला असता तर तो पुन्हा जोडला गेला असता. मात्र, शाळा प्रशासनाने तो न दिल्याने तसेच तो तुकडा कुठे गेला हेही माहीत नाही, असे उत्तर शाळा प्रशासनाकडून देण्यात आले.
 

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देतो. मात्र, विराजचा अपघात घडला तेव्हा तेथील वर्गखोलीच्या दरवाजाचा रोधक (स्टॉपर) निखळला होता, त्यामुळे दरवाजा जोरात लागला गेला असेल. त्याचे नख निघाले असेल म्हणून आम्ही प्रथमोपचार करून त्याला घरी सोडले. त्यात आमची काही चूक नाही.
- अब्दुल सय्यद, संचालक, हाजी लियाकत हायस्कूल नेरळ


साधारण दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास हाजी लियाकत शाळेतील शिक्षक विराज या विद्यार्थ्याला घेऊन आले होते. त्याच्या करंगळीच्या बोटावरचा एक भाग तुटला होता, त्यामुळे मी प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे प्रिस्क्रिप्शनवर लिहूनदेखील दिले होते. मात्र, त्याला माझ्याकडे आणताना फर्स्टएडसुद्धा केले गेले नव्हते.
- डॉ. महेश शिरसाट, नेरळ


विराजच्या तुटलेल्या करंगळीचा भाग मिळाला असता, तर कदाचित त्याचे बोट पूर्ववत झाले असते; पण त्याच्या बोटाला एवढी मोठी इजा झाली आहे. हेसुद्धा शाळेने सांगण्याची तसदी घेतली नाही. शाळेतून डॉक्टरांकडे उपचारासाठी नेतानाही कळवले नाही. जर मी दुसºया डॉक्टरांकडे मुलाला घेऊन तत्काळ उपचार केला नसता तर जंतुसंसर्ग होऊन विराजचा हात निकामी झाला असता मग जबाबदारी शाळेने घेतली असती का? या शाळेवर कारवाई झालीच पाहिजे. न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ.
- दिव्या ठक्कर,
पीडित मुलाची आई

Web Title: Student's finger broken in school accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.