लक्ष्मी आॅर्गॅनिक्सवर धडक मोर्चा
By Admin | Updated: June 1, 2016 02:55 IST2016-06-01T02:55:51+5:302016-06-01T02:55:51+5:30
महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅर्गॅनिक्स लिमिटेड या कारखान्यात उत्पादन केले जाणारे डायकेटीन हे आरोग्यास अपायकारक आणि प्रदूषणकारी उत्पादन त्वरित बंद करावे

लक्ष्मी आॅर्गॅनिक्सवर धडक मोर्चा
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅर्गॅनिक्स लिमिटेड या कारखान्यात उत्पादन केले जाणारे डायकेटीन हे आरोग्यास अपायकारक आणि प्रदूषणकारी उत्पादन त्वरित बंद करावे, या मागणीसाठी कारखान्यालगतच्या आसनपोई ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलासह कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाला लेखी निवेदन देऊन याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
महाड औद्योगिक क्षेत्रात लक्ष्मी आॅर्गॅनिक्सचे हे दुसरे युनिट गेल्या सहा वर्षांपासूनच कार्यरत असून, कारखान्यातील डायकेटीन हे उत्पादन आरोग्यास अपायकारक तसेच प्रदूषणकारी असल्याने हे उत्पादन बंद करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत इशारा दिलेला होता. मंगळवारी सकाळी १०.३० वा. आसनपोई येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी उपसभापती चंद्रकांत जाधव, सरपंच वसंत खोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम माने, लक्ष्मण गरुड, नारायण जाधव, दीपक गायकवाड, सुनीता गायकवाड, परेश सोनावणे, ज्ञानेश्वर जाधव, ग्रामपंचायत सदस्य माधुरी गुडेकर, कुंदा जाधव आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लक्ष्मी आॅर्गॅनिक्स डेप्युटी जनरल मॅनेजर जे. टी. सूर्यवंशी व पर्सनल मॅनेजर अॅड. विनोद देशमुख यांनी ग्रामस्थांचे हे निवेदन स्वीकारले. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
सोमवारी रात्री प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन, आ. भरत गोगावले, तहसीलदार संदीप कदम आदी अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या परीक्षणाच्या अहवालानंतर याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.