कर्जत आगारातील ST कर्मचारी आक्रमक; ७ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:18 AM2021-03-27T01:18:22+5:302021-03-27T01:18:40+5:30

कर्जत एसटी आगाराचा खालापूर आणि कर्जत या दोन तालुक्यात पसारा आहे. खोपोली एसटी स्थानकातील सर्व काम कर्जत आगारातून होत असते

ST staff in Karjat depot aggressive; Warning of fast from April 7 | कर्जत आगारातील ST कर्मचारी आक्रमक; ७ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

कर्जत आगारातील ST कर्मचारी आक्रमक; ७ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

googlenewsNext

कर्जत :  कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि आगार प्रमुख यांच्याकडून होत असलेल्या कारवाई विरोधात आक्रमक झाले आहेत.  गेली अनेक महिने आगार प्रमुख यांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी ७ एप्रिलपासून उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत एसटी आगाराचा खालापूर आणि कर्जत या दोन तालुक्यात पसारा आहे. खोपोली एसटी स्थानकातील सर्व काम कर्जत आगारातून होत असते. कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगार प्रमुख शंकर यादव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत. अधिकृत कामगार संघटना आपल्या समस्यांबाबत आणि कामगारांच्या वैयक्तिक समस्या, अडचणी यांच्याबाबत आगार प्रमुख यांना अडचणी ऐकून घेण्याची मागणी करीत आहेत. मात्र आगार प्रमुखांकडून कामगारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यात ३० जुलै रोजी कामगारांचे नियमबाह्य निलंबन करण्यात आल्यानंतर त्या कामगारांचे आणि संघटनेचे म्हणणे अद्याप आगार प्रमुख यांनी ऐकून घेतले नाही. कोरोना महामारीत कामगारांच्या रजा मंजूर करताना भेदभाव केला आणि प्रकृती ठीक नसलेले कामगार उपस्थिती झाले नाहीत म्हणून त्यांच्या रजा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आल्या नाहीत. कोरोना काळात केवळ मालवाहतूक सुरू होती मात्र त्यावेळी देखील कामगार वर्गाला रजा मंजूर करून घेण्यासाठी कामगार संघटनेला आगार प्रमुखांना विनवणी करावी लागत होती.

आगारातील कार्यशाळा बसेसला दोनवेळा अपघात झाले मात्र आपल्या जवळ वावरणारे यांच्या कमी दंडाची तर कामगार संघटनेत असलेल्या कामगारांवर कडक कारवाई आगार प्रमुख यांच्याकडून झाल्या आहेत. माल वाहतूक करताना चालकासोबत वाहक आवश्यक असताना चालक हा कामगार   संघटनेशी असेल तर त्याच्यासोबत वाहक दिला जात नाही. त्याचवेळी माल वाहतूक करणाऱ्या एसटी गाड्या यांचे टायर कमी व्हीलचे वापरण्यात येत असून अपघात होण्याची शक्यता माहिती असून देखील आगार प्रमुख १०.००.२० या आकाराचे टायर ऐवजी ९.००.२० या आकाराचे टायर वापरलेल्या गाड्या पाठवून वाहतूक करीत आहेत.

कामगारांना भत्त्याची रक्कम नाही
मुंबईत जाऊन माल वाहतूक करणाऱ्या कामगारांना रात्रवस्ती भत्ता आणि रात्रीचे भोजन यासाठी आगाऊ रक्कम दिली जात नाही. कार्यशाळेचे छप्पर पावसाळ्यात गळत असून पाण्याचे थेंब अंगावर घेत कर्मचारी वर्गाला त्याच स्थितीत कामे करावी लागत आहेत.   कर्जत आगार आणि खोपोली स्थानक येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पास देण्यासाठी कायमस्वरूपी कामगार नियुक्ती करण्यात आली नाही. आगारात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कामगारांना आपल्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची टंचाई भासत आहे. या सर्व मागण्यांसाठी कर्जत आगारातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांचे प्रतिनिधी यांनी आगार प्रमुख शंकर यादव यांना निवेदने देऊन चर्चा करण्याची मागणी केली आहे. गेल्या आठ महिन्यात आगार प्रमुख हे कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांना वेळ देत नाहीत. त्यामुळे  ७ एप्रिलपासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी हे उपोषणाला बसणार आहेत असा इशारा पेण रामवाडी येथील जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना दिलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

आम्ही शासनाच्या आदेशाने काम करीत असून  कामगार संघटनेने प्रशासनाबरोबर एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि म्हणून आपण कामगार संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलन होणार नाही याची काळजी घेऊ -शंकर यादव-आगार प्रमुख

Web Title: ST staff in Karjat depot aggressive; Warning of fast from April 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.