पोलादपुरात एसटी सेवा कोलमडली
By Admin | Updated: July 6, 2017 06:32 IST2017-07-06T06:32:10+5:302017-07-06T06:32:10+5:30
महाड आगाराअंतर्गत पोलादपूर बस स्थानकात एसटी सेवा पुरविली जाते. मात्र ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी सेवा

पोलादपुरात एसटी सेवा कोलमडली
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : महाड आगाराअंतर्गत पोलादपूर बस स्थानकात एसटी सेवा पुरविली जाते. मात्र ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी सेवा वारंवार रद्द होणाऱ्या फेऱ्या व अपुरा कर्मचाऱ्यांमुळे कोलमडली आहे. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून लहुळसे वस्ती फेरी बंद असल्याने या विभागातील जनता त्रस्त असून ही फेरी त्वरित सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे. तर पोलादपूर- मोरेवाडी एसटी गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आली असून ही फेरी फक्त महालगूरपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे मोरेवाडी परिसरातील प्रवाशांबरोबर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी त्रस्त झाले असून चार ते सहा किमी पायी प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. महालगूर -मोरेवाडी रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम करण्यात आले. मात्र ठेकेदाराला कमी अवधी मिळाल्याने या रस्त्यावर पावसात माती वाहून आल्याने ही सेवा बंद आहे.
पोलादपूर स्थानकातून सुटणारी मोरेवाडी आणि गोलदरा बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असल्याने पळचिल परिसरात जाणाऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यात अनेक एसटी फेऱ्या वारंवार रद्द होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून अनेक वेळा एसटी उपलब्ध असली तर चालक, वाहक नसतात. या स्थानकात अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळेही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी महाड आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देवून पोलादपूर तालुक्यात वारंवार विस्कळीत होणारी एसटी सेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बस फे ऱ्या रद्द
पोलादपूर स्थानकातून ९.२० वाजता सुटणारी मोरेवाडी ही एसटी तर सकाळी १० वाजता सुटणारी गोलदरा एसटीच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असल्याने पळचिल परिसरात जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.