मिनीट्रेन सुरू करण्यासाठी कामाला गती
By Admin | Updated: May 13, 2017 01:05 IST2017-05-13T01:05:06+5:302017-05-13T01:05:06+5:30
लागोपाठ दोन दिवस नॅरोगेज रु ळावरून खाली घसरल्याने ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली मिनीट्रेन पुन्हा रुळावर

मिनीट्रेन सुरू करण्यासाठी कामाला गती
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : लागोपाठ दोन दिवस नॅरोगेज रु ळावरून खाली घसरल्याने ९ मे २०१६ रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली मिनीट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिनीट्रेनच्या २१ किलोमीटरच्या नॅरोगेज मार्गावर मिनीट्रेनला आणि पर्यटकांना सुरक्षित प्रवास घडविण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीची आणि नवीन कामे सुरू केली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन पुन्हा रु ळावर आणण्यासाठी रेल्वेकडून सुरु असलेल्या प्रयत्नामुळे मिनीट्रेन पुन्हा
रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शंभर वर्षांचा इतिहास असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन गतवर्षी मे महिन्यात एकाच ठिकाणी लागोपाठ दोन दिवस रु ळावर खाली घसरली. त्यावेळी मिनीट्रेनचे प्रवासी डबे रु ळावर खाली पडून झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, परंतु मिनीट्रेनला झालेला अपघात यामुळे थेट रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवली.त्यानंतर मागील सहा महिने या मिनीट्रेनच्या मार्गाची दैनंदिन दुरु स्ती करण्याकडे मध्य रेल्वेने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. शंभर वर्षे विनाअडथळा सुरू असलेली आणि जगातील वारसासाठी नामांकन झालेली मिनीट्रेन पुन्हा सुरु व्हावी यासाठी दबाव वाढल्याने जानेवारी २०१७ मध्ये मध्य रेल्वेने मिनीट्रेन पुन्हा सुरु करून तिला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल असे जाहीर केले होते. त्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनसाठी तीन नवीन इंजिने बनवून घेतली आहेत. मुंबई कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनवून नेरळ येथे पाठविली आहेत. त्यामुळे मिनीट्रेन पुन्हा सुरु होण्याबाबत काहीसा दिलासा पर्यटक आणि या गाडीवर अवलंबून असलेल्या माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मिळाला आहे.
त्यानुसार मिनीट्रेनचा नॅरोगेज मार्ग पर्यटक प्रवासी यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित करण्याचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. मिनीट्रेनच्या २१ किलोमीटरच्या नॅरोगेज मार्गात ज्या ठिकाणी खोल दरीसारखा भाग आहे, तसेच ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत अशा ठिकाणी मिनीट्रेनचे इंजिन रु ळावरून खाली घसरले तरी प्रवाशांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी दगडी संरक्षण भिंती उभारण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार लोखंडी तारांमध्ये दगड बांधण्याची कामे केली जात आहेत, त्या गॅबियनची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २१ किलोमीटरच्या एकूण नॅरोगेज मार्गात तब्बल ६०० मीटर भागात सिमेंटच्या साहायाने संरक्षण भिंत बांधण्यास
सुरुवात झाली आहे. या सर्व कामांसाठी ६ कोटी रु पयांची तरतूद रेल्वेने केली आहे. तर मिनीट्रेन वर्षभर बंद असल्याने या ट्रॅकवर दुरु स्तीची कामे बंद ठेवली होती. ती सर्व कामे मध्य रेल्वेच्या आयडब्लूआय विभागाकडून सुरु असून शंभरहून अधिक कामगार ती कामे करीत असताना संरक्षण भिंतीची कामे ठेकेदारामार्फत करण्यात येत आहेत. नॅरोगेज रु ळाच्या आजूबाजूला आणि ट्रॅकच्यामध्ये माती आणून टाकली जात आहेत. ही सर्व कामे सध्या ज्या गतीने सुरु आहेत, ते पाहता रेल्वे प्रशासन मिनीट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेने मिनीट्रेन नॅरोगेज ट्रॅकवर आणण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न या केवळ माहितीने माथेरानचा पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येतील असा माथेरानमधील व्यावसायिकांंना विश्वास आहे.