विशेष मुलांनी साकारले १४ हजार मूषक
By Admin | Updated: July 23, 2015 04:05 IST2015-07-23T04:05:56+5:302015-07-23T04:05:56+5:30
बालगोपाळांच्या भाषेतला उंदीरमामा अर्थात मूषक हे विघ्नहर्त्या गणरायांचे विश्वभ्रमणाचे वाहन. धर्मशास्त्रात म्हणूच या उंदीरमामांना

विशेष मुलांनी साकारले १४ हजार मूषक
जयंत धुळप, अलिबाग
बालगोपाळांच्या भाषेतला उंदीरमामा अर्थात मूषक हे विघ्नहर्त्या गणरायांचे विश्वभ्रमणाचे वाहन. धर्मशास्त्रात म्हणूच या उंदीरमामांना मोठे महत्त्व आणि मान आहे. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवल्यावर करंजीचा नैवेद्य या उंदीरमामांना दाखवावा लागतो. अशा अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या तब्बल १४ हजार उंदीरमामांची निर्मिती करण्याचा विक्रम पेणमधील ‘आय डे केअर’ संस्थेतील ३५ गतिमंद मुलांनी केला आहे.
विघ्नहर्त्या गणरायांच्या विश्व वावराकरिता आवश्यक उंदीर या त्यांच्या वाहनांची निर्मिती चक्क स्वत:च्या आयुष्यात असलेल्या विघ्नावर मात करून आपण करू शकतो, असा दृढ आत्मविश्वास ‘आय डे केअर’ संस्थेच्या संस्थापक व प्रमुख शिक्षिका स्वाती मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ‘विशेष मुलां’मध्ये अथक मेहनतीअंती निर्माण करण्यात यश मिळविले आणि आज हे विशेष मुलांचे विक्रमी कर्तृत्व वास्तवात उतरले आहे. ‘आय डे केअर’ संस्था पेणमध्ये २०१० पासून विशेष मुलांचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. सध्या या केंद्रात ३५ विद्यार्थी शालेय तथा व्यवसाय प्रशिक्षण घेत असून या केंद्रात या विशेष मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याकरिता विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. पेपरबॅग बनविणे, मेणबत्ती बनविणे, कार्डबोर्डच्या फाईल बनविणे, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून श्रीगणेशाचे वाहन मूषक बनवणे या प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश आहे.