सहा मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
By Admin | Updated: April 11, 2017 02:01 IST2017-04-11T02:01:34+5:302017-04-11T02:01:34+5:30
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार

सहा मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सुमारे ९० किलोमीटरच्या रस्त्यांचा आता विकास करणार असल्याने नागरिकांना उच्च प्रतिचे आणि वेगवान रस्ते मिळणार आहेत. त्यामुळे पैशासह वेळेच्या बचतीबरोबरच वाहतूक आणि पर्यटन उद्योगाला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. महामार्गाच्या विकासाबरोबरच रस्त्यालगतच्या जमिनींचाही भाव चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेटच्या व्यवसायाला नवी झळाळी मिळणार आहे.
अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत. त्यापैकी अलिबाग-वडखळ रस्ता मार्च २०१६ मध्येच राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. २०१५ साली या रस्त्याची मागणी राष्ट्रीय महामार्गाने केली होती. २०१६ मध्ये उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याबाबत अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले होते. ते रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याला मंजुरी मिळाली आहे.
वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण याचा विचार करता या मार्गावर वाहतुकीची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जातो. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार असल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम
सहा मार्गांचा विकास होणार असल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेला वेगळा आयाम प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग त्या रस्त्यांचा विकास करणार असल्याने त्यांचा दर्जा, गुणवत्ता हा अधिक चांगला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.
रस्त्यांचा विकास होणार असल्याने त्या रस्त्यांच्या लगतच्या आणि परिसरतील जमिनींचेही भाव चांगलेच वधारणार असल्याने तेथे रिअल इस्टेटचा व्यवसायही तेजीत येणार आहे. रस्ते चांगले झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन उद्योग तेजीत येणार आहे. त्यामुळे विविध रोजगारांच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
- अलिबाग-वडखळ २२ किलोमीटर, अलिबाग-रेवस २० किलोमीटर, अलिबाग-बाह्यवळण सुमारे दीड किलोमीटर, सारळ- शिरोली- सहा किलोमीटर, मुरुड- आगारदांडा १० किलोमीटर आणि सारळ- मुरुड ३० असे एकूण तब्बल ९० किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत जाणार आहेत.