सहा महिन्यांत तंबाखूयुक्त ३५ लाखांचा माल जप्त
By Admin | Updated: November 9, 2016 03:59 IST2016-11-09T03:59:16+5:302016-11-09T03:59:16+5:30
परराज्यातील उत्पादकांकरिता रायगड जिल्हा बनावट सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याचे गेल्या सहा महिन्यांत

सहा महिन्यांत तंबाखूयुक्त ३५ लाखांचा माल जप्त
जयंत धुळप, अलिबाग
परराज्यातील उत्पादकांकरिता रायगड जिल्हा बनावट सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याचे गेल्या सहा महिन्यांत रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्रांतून समोर येत आहे. गेल्या १ एप्रिलपासून ३१ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेल्या छाप्यांमध्ये तंबाखूयुक्त ३५ लाख ७९ हजार रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला असून रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील ही विक्रमी नोंद आहे.
शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी नागोठणे येथील मे. नेहल स्टोअर्स येथे छापा टाकून ८४ हजार ८०० रुपये किमतीची बेकायदा घोडा छाप तपकीर आणि ७ हजार ६८० रुपये किमतीच्या मैना या बेकायदा विडीचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ व त्या अंतर्गत नियम २००८ नुसार सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापणे हे १ एप्रिल २०१६ पासून बंधनकारक करण्यात आले असून या नियमाची अंमलबजावणी या प्रशासनातर्फे यशस्वीरीत्या करण्यात येत आहे. रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या रायगड(पेण) कार्यालयास रोहा तालुक्यात तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा न छापता त्या उत्पादनाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीची खातरजमा करुन शनिवारी नागोठणे येथील मे. नेहल स्टोअर्स येथे छापा टाकू न या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापणे बंधनकारक असताना सुध्दा घोडा छाप तपकिरीच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर तसेच तन्मय विडीच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापलेला आढळून आला नाही. परिणामी घोडा छाप तपकीर व तन्मय विडीचा हा एकूण ९२ हजार ४८० रुपये किमतीचा साठा जप्त केल्याचे संगत यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असून उत्पादकाचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ व त्या अंतर्गत नियम २००८ नुसार पुढील कारवाई करण्यात येईल. नागोठणे येथील ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी केली.