शिवाई संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल
By Admin | Updated: June 15, 2016 01:13 IST2016-06-15T01:13:36+5:302016-06-15T01:13:36+5:30
महाड - पोलादपूर तालुक्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा शिवाई संस्थेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रम

शिवाई संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल
महाड : महाड - पोलादपूर तालुक्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा शिवाई संस्थेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी विरेश्वर मंदिर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वा. संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी आ. भरत गोगावले, माजी आ. माणिक जगताप, माजी आ. सूर्यकांत दळवी, अण्णासाहेब सावंत बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत, माजी आ. देवेंद्र साटम, जि. प. माजी अध्यक्ष अरुण देशमुख, सहाय्यक निबंधक सुनील मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अॅड. संतोष काहे, अॅड. विनोद देशमुख, अशोक देशमुख, किशोर मोरे आदि ध्येयवेड्या तरुणांनी एकत्र येवून सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिवाई नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेची आजची प्रगतिपथावरील वाटचाल निश्चितच कौतुकास्पद असल्याचे पहायला मिळते. तत्कालीन ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांचे यासाठी सहकार्य लाभले. पंचवीस वर्षांपूर्वी केवळ १७ हजार रुपये इतके भागभांडवल असलेल्या शिवाई पतसंस्थेची आजची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या वर गेली आहे. महाडसह बिरवाडी आणि पोलादपूर येथील शाखांच्या माध्यमातून शिवाई पतसंस्थेने सामान्य माणसाला स्वत:च्या पायावर उभे करून असंख्य लहानसहान व्यक्तींना पतपुरवठा करून त्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे.
स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे या पतसंस्थेने दोन्ही तालुक्यात नावलौकिक मिळवला आहे. त्याकाळी तालुक्यातील ग्रामीण भागाची शिक्षणाची गरज लक्षात घेवून तालुक्यातील दाभोळ, मुमुर्शी येथे आदिवासी आश्रमशाळा, महाड शहरात माध्यमिक विद्यालय व पोलादपूर येथे स्वत:चे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. पोलादपूर येथील महाविद्यालयात तर एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या महाविद्यालयामुळे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण व शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. (वार्ताहर)
सामाजिक उपक्रम राबविणार
पोलादपूरच्या सुंदरराव मोरे महाविद्यालयाला नॅक या सर्वोच्च संस्थेचे दोन वेळा मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. महाड, पोलादपूर तालुक्याच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य पंचवीस वर्षे पूर्ण करणाऱ्या शिवाई संस्थेने के ले आहे.
शिवाई पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, तर शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून अॅड. संतोष काळे हे काम पाहत आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात जलसंवर्धन, आरोग्य तपासणी शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, श्रमसंस्कार शिबिर आदि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. विनोद देशमुख यांनी दिली.