वरंध घाटात साईडपट्ट्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 03:47 IST2016-06-24T03:47:42+5:302016-06-24T03:47:42+5:30

महाड-भोर-पंढरपूर हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरील वरंध घाटातील साईडपट्ट्यांची आणि संरक्षक कठड्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने

Sideways in Warp Ghat | वरंध घाटात साईडपट्ट्यांची दुरवस्था

वरंध घाटात साईडपट्ट्यांची दुरवस्था

महाड : महाड-भोर-पंढरपूर हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरील वरंध घाटातील साईडपट्ट्यांची आणि संरक्षक कठड्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने हा घाट मार्ग वाहतुकीला धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी या साईडपट्ट्या व कोसळलेल्या संरक्षक कठड्यांची कामे करण्याची आवश्यकता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
वरंध घाटातील अवघड वळणावर वाहने नेताना चालकांपुढे मोठी समस्या यामुळे निर्माण होत असून कोसळलेल्या कठड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. काही वर्षांपूर्वी या घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप खाली कोसळून त्यातील अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतरही या घाटात वारंवार अपघात घडत असतात. या मार्गावर पर्यटकांची वाहने, तसेच मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचीही दिवसेंदिवस वर्दळ वाढत असून या घाटातून नव्याने वाहने चालवण्याचे काम जिकिरीचे बनत आहे. वरंध गावापासून माझेरीपर्यंतचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनाही पावसाळ्यात नियमितपणे घडत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. (वार्ताहर)

वाकण-पाली मार्गावरील डोंगर पोखरल्याने झाडे कोसळण्याची भीती

पाली : वाकण-पाली रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. नवीन रस्त्याच्या दोन्ही बाजूस माती देखील टाकण्यात आली आहे. परंतु वाकणपासून जवळच असलेल्या वजनकाट्याजवळील वळणावरील रस्त्याच्या साईडपट्टीवर टाकण्यात आलेली माती तेथीलच डोंगर पोखरून काढण्यात आली. ती माती निकृष्ट दर्जाची आहे व त्यामध्ये दगड-गोटे देखील आहेत. यामुळे येथे भूस्खलन होवून झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करताना या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या डोंगरावरची माती जेसीबी मशिनच्या सहाय्याने खोदल्याने त्या डोंगरावरील मोठाले दगड रस्त्याच्या बाजूलाच पडले आहेत. तर काही मोठ्या झाडांची मुळे देखील माती उत्खननाने तुटली असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी झाडे कोसळण्याची व भूस्खलन होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठेकेदाराच्या कामाकडे लक्ष देणे गरजेचे असताना विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. पावसाळ्यात अशी मोकळी झालेली माती रस्त्यावर येवून चिखल होण्याची शक्यता आहे. तसेच तेथील डोंगर पोखरून माती काढल्याने पावसाळ्यात या डोंगरावरील वृक्ष उन्मळून व दरड कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sideways in Warp Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.