महामार्गावर साईडपट्टीची दुरवस्था
By Admin | Updated: November 9, 2016 03:56 IST2016-11-09T03:56:54+5:302016-11-09T03:56:54+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून महामार्ग बांधकाम विभागाने महामार्गालगत असलेल्या साईडपट्ट्या लागणाऱ्या पावसामध्ये

महामार्गावर साईडपट्टीची दुरवस्था
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून महामार्ग बांधकाम विभागाने महामार्गालगत असलेल्या साईडपट्ट्या लागणाऱ्या पावसामध्ये रस्त्यालगत उगवणारे गवत देखील अद्याप कट केलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत इंदापूर ते कशेडी दरम्यान अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच नाहीत तर अनेक ठिकाणचे भराव खचलेले आहेत. या दरम्यान जरी खड्डे कमी असले तरी खचलेली साईडपट्टी व उगवलेले गवत यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. तांत्रिक अडचणीमुळे सध्या तरी हे काम ठप्प झाले आहे. या टप्प्यामध्ये संपूर्ण महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या पर्यटक तसेच चाकरमान्यांचे या खड्ड्यांमुळे कंबरडेच मोडत आहे. इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्याच्या कामाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेल्याला दोन वर्षे झाली. काम अर्धवट असून ठप्प झाले आहे. जरी दुसऱ्या टप्प्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम सुरू असले तरी या कामाला सुरुवात कधी होईल व हे काम पूर्ण कधी होईल हा मात्र संभ्रमाचा भाग आहे. सध्याच्या परिस्थितीत इंदापूर ते कशेडी दरम्यान असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगतच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी खचलेल्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी धुपून गेल्या आहेत. ही अवस्था असताना यंदा पावसाळ्यात या साईडपट्ट्यांवर उगवलेले ४ ते ५ फूट उंचीचे गवत तेही तसेच उभे आहे. इंदापूर ते कशेडी हा महामार्ग अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करणाऱ्या तिसऱ्या वाहनाला रस्त्याकडेला साईडपट्टीवर उतरल्याशिवाय मार्गच नाही. मात्र अशा वेळी साईडपट्टी नसल्याने वाहन चालकांना अपघातापासून वाचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इंदापूर ते कशेडी दरम्यान या महामार्गावर अनेक अवघड वळणे आहेत. या दरम्यान वळणावरच मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे आतापर्यंत पहावयास मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये रस्त्याकडेला उगवलेले गवत आजतागायत महामार्ग विभागाने साफ करून घेतलेले नाही. या अवघड वळणावर दोन्ही बाजूस जाणाऱ्या वाहनचालकांना समोरील वाहन दिसतच नाही. अशा परिस्थिती गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना वाहन चालकांना सामोरे जावे लागले आहे.
दरवर्षी साईडपट्ट्या भरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतो. ठेकेदार ज्या पद्धतीत साईडपट्टी भरण्यासाठी ज्या दर्जाचा मुरु म पाहिजे तो टाकत नाही. मातीचे भराव करून सोडून देतो. यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच साईडपट्ट्या धुवून जातात व पावसाळ्यामध्ये या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू होते. सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या महामार्गालगत अनेक ठिकाणी साईडपट्ट्या खचल्या आहेत. तर काही ठिकाणी धुवून गेल्या असून रस्ता व साईडपट्टीचा भाग खालीवर झाला आहे. तर संपूर्ण या दरम्यान महामार्गालगत गवत उगवलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत वाहन चालकांना या मार्गावरून अपघातांना सामोरे जावून प्रवास करावा लागत आहे. (वार्ताहर)