वर्षभरात साकारणार श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर

By Admin | Updated: April 30, 2017 03:46 IST2017-04-30T03:46:38+5:302017-04-30T03:46:38+5:30

श्रीवर्धन ही पेशव्यांची जन्मभूमी आणि मूळ गाव आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनमधील चित्पावन घराण्यातील पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणाऱ्या

Shrimant Peshwa Memorial Temple will be set up during the year | वर्षभरात साकारणार श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर

वर्षभरात साकारणार श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर

- जयंत धुळप, अलिबाग

श्रीवर्धन ही पेशव्यांची जन्मभूमी आणि मूळ गाव आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनमधील चित्पावन घराण्यातील पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणाऱ्या श्रीवर्धन येथे पेशवे घराण्याची पिढीजात देशमुखी होती, अशी इतिहासात नोंद आहे. त्यामुळेच श्रीवर्धन आणि पेशवे असे एक प्राचीन ऐतिहासिक समीकरण आहे.
श्रीवर्धन येथे बाळाजी विश्वनाथ यांच्या वाड्याच्या चौथऱ्याचे काम झाले आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागात बाळाजींचा चित्रवृत्तान्तचा उल्लेख आहे. सद्यस्थितीत श्रीवर्धन शहरात श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर असा फलक लावून तटबंदी केलेला परिसर आहे. श्रीवर्धनला येणारे पर्यटक आणि विशेषत: इतिहासप्रेमी पेशव्यांच्या या स्मृती पाहण्यासाठी आवर्जून येतात; परंतु या स्मारक परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पाहिल्यावर मोठी निराशाच पदरी पडते. मात्र वर्षभरात ‘श्रीमंत पेशवे स्मारक’ साकारेल, असा विश्वास श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी व्यक्त केला आहे.
पेशवे मंदिर परिसरातील सहा गुंठे जागा नगरपरिषदेची असून उर्वरित शेजारील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टची १२ गुंठे जागा विकत घेण्याची गेल्या २९ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया आता अखेरच्या टप्प्यात आहे. त्याबाबत ट्रस्टशी सुरू असलेली बोलणी सकारात्मक असल्याने वर्षभरात स्मारक नक्की उभे राहील, असा विश्वास भुसाणे यांनी व्यक्त केला.
श्रीवर्धन शहराची विकास योजना ४ जानेवारी १९८८ अन्वये मंजूर झाली असून, ती २५ एप्रिल १९८८ पासून अमलातदेखील आली आहे. मंंजूर विकास योजनेमध्ये पेशवे स्मारक आरक्षण ठेवले असून या आरक्षणाखाली, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट यांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे. देवस्थानने ११ मे १९९५ रोजी आरक्षणाखालील तसेच आरक्षणाच्या बाजूस असणारी जागा एकूण क्षेत्र ०-१८-० नगरपरिषदेस वाटाघाटीने देण्याबाबत ठराव करून मंजुरी दिली आहे.

८०० रुपयांवरून १४०० रुपये प्रति चौ. मीटर दर
- रायगड जिल्हाधिकारी ते मंत्रालय अशा सत्रावर तत्कालीन पालकमंत्री तटकरे यांनी घेतलेल्या सर्व बैठकांती झालेल्या निर्णयांती नगरपरिषदेने ८ फेब्रुवारी २०१३ रोजी दुय्यम निबंधक, श्रीवर्धन यांच्या कार्यालयाकडून २०१३ रोजीचा मूल्यांकन दाखला प्राप्त करून घेतला असता, त्या जागेचे मूल्य एकूण ८२ लाख ८० हजार रुपये (रु. १४००/- प्रतिचौ.मी.) निष्पन्न झाले. दरम्यान, सहायक संचालक, नगर रचना कार्यालयाने ९ आॅक्टोबर २०१४ अन्वये या जागेचे मूल्यांकन १४०० रुपये प्रतिचौ. मी. योग्य असल्याचे कळविले.
- नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. जागा खरेदीबाबत पुढील कार्यवाही करणेस मंजुरी प्राप्त झाली आहे. २०मार्च २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्थांना जमिनीचे संपादन आणि खरेदी करणेबाबत त्यांचे म्हणणे मांडणेसाठी नगरपरिषदेमध्ये बोलवावे, असे ठरले आणि त्या बाबतची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असल्याने आता नव्या स्वरूपातील ‘श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर’ दृष्टिपथात आले आहे.

रेडिरेकनरप्रमाणे दर अपेक्षित : नगर रचना खात्याने केलेल्या मूल्यांकनाचा ८०० रुपये प्रतिचौ.मी. दर कमी असल्याने व रेडिरेकनर( शीघ्र सिद्धगणक) प्रमाणे या जागेचा दर १८०० रुपये प्रतिचौ.मी. असल्याने रेडिरेकनरप्रमाणे त्यांना जागेचा दर मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन १२ जानेवारी २०११ रोजी श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टने तत्कालीन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांना दिले. त्यावरील निर्णयानुसार नगरपरिषदेने खासगी वाटाघाटीने जागा घेणेचे निश्चित केले.

Web Title: Shrimant Peshwa Memorial Temple will be set up during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.