उपसभापतीपदी शामसुंदर साळवी
By Admin | Updated: July 30, 2015 23:32 IST2015-07-30T23:32:15+5:302015-07-30T23:32:15+5:30
खालापूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य शामसुंदर साळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. खालापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ८ पैकी ५ सदस्य आहेत.

उपसभापतीपदी शामसुंदर साळवी
खालापूर : खालापूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य शामसुंदर साळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. खालापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ८ पैकी ५ सदस्य आहेत. उपसभापती गजानन मांडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.
शिवसेनेच्या वतीने शामसुंदर साळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, तालुका प्रमुख संतोष विचारे, भाई शिंदे, मोतीराम ठोंबरे, कर्जतचे उपसभापती मनोहर थोरवे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेमुळे आपल्याला उपसभापती पदाची संधी मिळालेली आहे. हे पद जबाबदारीचे असून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, ग्रामीण भागातील जनतेचे अनेक लहान-लहान प्रश्न पंचायत समितीशी निगडित असतात यासाठी अनेकदा ग्रामस्थांना फेऱ्या माराव्या लागतात. नागरिकांची गैरसोय होवू नये आणि त्यांची कामे वेळेत मार्गी लागावीत यासाठी पूर्ण वेळ पंचायत समितीमध्ये उपस्थित राहणार आहे, असे वक्तव्य नवनिर्वाचित उपसभापती शामसुंदर साळवी यांनी केले.
(वार्ताहर)