अलिबाग ब्राह्मण आळीतील गटारांचे काम अर्धवट; छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले
By निखिल म्हात्रे | Updated: January 5, 2024 19:35 IST2024-01-05T19:30:59+5:302024-01-05T19:35:05+5:30
अर्धवट बांधलेल्या गटारांवर झाकणे नीट लावली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी

अलिबाग ब्राह्मण आळीतील गटारांचे काम अर्धवट; छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: नगरपरिषद अलिबाग यांच्या मार्फत सुरू असलेले अलिबाग ब्राम्हण आळी राममंदिरा समोरील गटाराचे काम गेले तीन महिने सुरू असून ते अर्धवट ठेवल्याने लगतच्या रस्त्यावर अपघात तसेच सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. परिसरातील नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. अर्धवट बांधलेल्या गटारांवर झाकणे नीट लावली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. छोटे मोठे अपघात होणे नित्याचे झाले आहे.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत भूमिगत गटाराची योजना अलिबाग राबवली जाणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अपयशी ठरला. आता पुन्हा राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत नव्याने भूमिगत गटार योजना राबवली जाणार आहे. ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
अलिबाग शहराची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. खोदाई केल्यावर पाणी लागते. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच होरिझोन्टल डायरेक्शनल ड्रीलिंग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. कमीत कमी उत्खनन असणार आहे.
टेक्नॉलॉजीमार्फत भुयारा गटार साठी नवीन प्रयोग राबवले जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. असे असताना हा अर्धवट गटारांच घाट ठेकेदारांना पोसण्यासाठी घातल आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.