रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करणार; आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:18 IST2020-12-01T00:17:58+5:302020-12-01T00:18:12+5:30
नव्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबागजवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून ५० एकरहून अधिक जागा निश्चित करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करणार; आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करण्यात येणार आहे. रायगडच्या जनतेला अत्याधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज अशी प्रगत आरोग्य सेवा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाहणी केली. यावेळी प्रस्तावित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, आरसीएफचे अधिकारी देशमुख, जिल्हा रुगणालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मेडिकल काॅलेजचा प्रश्न सोडवून ते लवकरच सुरू करण्यात यावे, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी दौरा केला, तसेच शासकीय महाविद्यालयात येणाऱ्या मुलांना वसतिगृहाची व्यवस्था करण्यासाठी आरसीएफ वसाहत कुरुळ येथे ही भेट दिली, तसेच हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याचा विचार असून, केंद्र सरकारचे पथक लवकरच पाहणीसाठी येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
नव्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबागजवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून ५० एकरहून अधिक जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला असून, तात्पुरत्या स्वरूपात हे कॉलेज सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची सध्याची उपलब्ध जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील इमारती वापरता येतील का, याची पाहणी करून आदिती तटकरे यांनी आढावा घेतला,
अन्य कामेही पूर्ण करा
सामान्य रुग्णालय परिसरातील अन्य इमारतींची कामेही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. सध्या रुग्णालयाची जागा अपुरी पडते आहे, हे खरे आहे. परंतु नवीन प्रशस्त जागेत जिल्हा रुग्णालय उभारण्याचा मानस तटकरे यांनी व्यक्त केला, तर भविष्यात आयुर्वेदिक विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मागील वर्षात रायगडच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मंजुरी दिली. राज्यातून अनेक जिल्ह्यांचे प्रस्ताव गेले आहेत, परंतु सर्वात प्रथम रायगडच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे रायगडमधील वैद्यकीय महाविद्यालय आधी सुरू व्हावे, पुढील शैक्षणिक वर्षात पहिली बॅच सुरू करण्याचा प्रयत्न आहे.