मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यात
By Admin | Updated: August 29, 2015 22:13 IST2015-08-29T22:13:20+5:302015-08-29T22:13:20+5:30
मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक

मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यात
दासगाव : मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेची अवस्था बिकट झाली असून या ठिकाणी तीन अधिकारी व ३३ कर्मचारी अशी नेमणूक असताना फक्त चार कर्मचारी काम करत असल्याने ते सध्या पुरेशी सेवा देऊ शकत नाही. यामुळे सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेअंतर्गत असणाऱ्या विभागाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुुंबई - गोवा महामार्गावर पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हात खांबा, कसाल या ५०० किलोमीटर अंतरावर महामार्ग पोलीस वाहतूक शाखेची निर्मिती करत या ठिकाणी महामार्गालगत चौक्या उभारण्यात आल्या. महामार्गावर वाढती वाहतूक, होणारे अपघात व येणाऱ्या इतर अडचणी दूर करण्यासाठी या शाखांची निर्मिती करण्यात आली. मात्र गेले वर्षभर या ठिकाणी फक्त १ अधिकारी व १४ कर्मचारी काम करीत आहेत.
पोलीस महामार्ग महाड शाखेतून १ अधिकारी व ८ कर्मचारी नाशिक कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत तर १ कर्मचारी पनवेल कार्यालयात काम करत असून १ कर्मचारी रजेवर आहे. अशा या बिकट परिस्थितीत महाड वाहतूक शाखेत फक्त ४ कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मात्र ते रजेवर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. महामार्गाच्या सुरक्षेसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग आवश्यक असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
१० सप्टेंबरपासून लाखो गाड्यांची वर्दळ
येत्या १७ सप्टेंबरपासून गणपती हा सण कोकणात सुरु होणार आहे. १० सप्टेंबरपासूनच लाखो गाड्यांची वर्दळ या महामार्गावर सुरु राहणार आहे, असे असताना महामार्ग मध्य वाहतूक शाखेत ४ कर्मचारी काम करत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे चार कर्मचारी शाखा सांभाळतील की महामार्गावर लोकांना सेवा देतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.