रामिष्टेंवर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू
By Admin | Updated: November 18, 2016 03:36 IST2016-11-18T03:36:51+5:302016-11-18T03:36:51+5:30
अखिल भारतीय माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर मंगळवारी रात्री

रामिष्टेंवर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू
पेण : अखिल भारतीय माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास पेण-खोपोली रस्त्यावरील योगीराज ढाबा येथे गोळीबार झाला. अज्ञात दोन मारेकऱ्यांनी त्यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याचे गोळीबारातून निष्पन्न होत आहे. मुंबईचे गँगवॉर पेण शहरापर्यंत येवून ठेपल्याने या मारेकऱ्यांचा तपास घेण्यासाठी वेगवान हालचाली पोलीस यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत.
मंगळवारी दिवंगत माथाडी कामगार नेते बाबूराव रामिष्टे यांच्या पुण्यस्मरण दिनाचा मुंबई वडाळा येथील निवासस्थानी कार्यक्रम आटोपून अविनाश रामिष्टे नागोठणे येथे सुप्रीम पेट्रोकेम लि. कंपनीमधील आमडोशी गावाजवळ युनियनच्या ५१ कामगारांना टी शर्ट वाटप कार्यक्रमानिमित्त रायगड जिल्ह्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्यावर पाळत ठेवून मारेकरी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व होणारी वाहतूककोंडी लक्षात घेवून मारेकऱ्यांना आपला हेतू साध्य करता आला नसावा. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. नागोठणे येथील कार्यक्रम आटोपून येताना रात्र झाल्याने पेण-खोपोली रस्त्यावर जेवण करण्यासाठी योगीराज ढाब्यावर गेले. जेवण उरकून मुंबईकडे परतताना दोन मोटारसायकलवरून आलेल्या दोेघांनी ते स्कार्पिओ (गाडी नं. एमएच ४३ एआर १५५५) गाडीचे दार उघडून बसत असताना त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र या गोळीबाराच्या आवाजानेच त्यांचे अंगरक्षक एकनाथ ढाकणे सतर्क झाले आणि त्यांनी क्षणार्धात अविनाश रामिष्टे यांना सुरक्षा दिल्याने त्यांच्या दिशेने येणारी गोळी समोरच्या काचेला लागून गेली. यात कोणीही जखमी झाले नाही. मारेकरी अंधाराचा फायदा उठवीत पळून गेले. मात्र पोलीस यंत्रणा सतर्क झाली. डीवायएसपी जयसिंग तांबे, गुन्हे अन्वेषणचे जितेंद्र व्हनकोटी, पेण पीआय अशोक जगदाळे या अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा तत्काळ हजर झाला. पेण पोलीस ठाण्यात या अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माथाडी कामगार संघटनांमधील या नेत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने कामगारवर्गातसुद्धा खळबळ माजली आहे. या गुन्ह्याचा तपास पेण पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे करीत आहेत. (वार्ताहर)