भंगार गोदामाला भीषण आग
By Admin | Updated: April 21, 2017 00:24 IST2017-04-21T00:24:43+5:302017-04-21T00:24:43+5:30
महाड औद्योगिक क्षेत्रातील एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोदाम खाक झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोन

भंगार गोदामाला भीषण आग
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोदाम खाक झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोन अग्निशामकांनी ही आग आटोक्यात आणली. गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी महाड औद्योगिक क्षेत्रातील बेकायदा भंगार गोदामाचा मुद्दा यानिमित्त पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील श्रीहरी केमिकल्स कारखान्याच्या जवळील टेमघर गावच्या हद्दीत असलेल्या या भंगार गोदामात रसायनांचे रिकामे ड्रम्स, प्लास्टिक सामानासह रासायनिक पदार्थांचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर असल्याने अचानक लागलेल्या आगीने रासायनिक व ज्वलनशील पदार्थाने काही क्षणार्धात पेट घेतला व आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या लोंढ्याने आजूबाजूच्या परिसरात व आकाशात उंच धुराचे लोळ पसरले गेले. महाड नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण गोदाम खाक झाल्याने दिसून आले. (वार्ताहर)
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे बेकायदा भंगार गोदामांचे अड्डे मोठ्या संख्येने असून औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या बेकायदा भंगार गोदामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षांपूर्वी अशाच एका बंद कारखान्याच्या आवारात बेकायदा थाटलेल्या भंगार गोदामात रसायनांचा स्फोट होवून तिघा जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर देखील या बेकायदा भंगार गोदामांवर व ते चालवणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नव्हती. केमिकल झोन म्हणून ओळख असलेल्या या महाड औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारचे भंगार गोदाम अत्यंत धोकादायक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात फेरफटका मारल्यास हे औद्योगिक क्षेत्र म्हणजे बेकायदा भंगार अड्ड्यांचे आगारच असल्याचे दिसून येईल.