साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावासह झेपावणार मंगळयान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:29 AM2019-07-17T00:29:00+5:302019-07-17T00:29:07+5:30

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै २०२० च्या दरम्यान प्रस्तावित आहे.

Salvinde will be the name of students of the school of Mangalaya! | साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावासह झेपावणार मंगळयान!

साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावासह झेपावणार मंगळयान!

Next

म्हसळा : नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची बहुउद्देशीय मंगळ मोहीम जुलै २०२० च्या दरम्यान प्रस्तावित आहे. हे मंगळयान रायगड जिल्हा परिषद शाळा साळविंडे शाळेतील विद्यार्थ्यांची नावे सोबत घेऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील प्रक्षेपण केंद्रातून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. यासाठीची आॅनलाइन नोंदणी नुकतीच साळविंडे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची करण्यात आली आहे. यासाठी मिळालेल्या सर्व बोर्डिंग पासचे सर्व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
मानवाचे पाऊल मंगळ ग्रहावर पडण्याअगोदर आपले नाव मंगळावर पाठविण्याची संधी नासा या संस्थेने मार्स २०२० या मंगळयानाच्या माध्यमातून जगभरातील सर्व जनतेला उपलब्ध करून दिली आहे. अतिशय सूक्ष्म आकाराच्या चिपवर सर्वांची नावे कोरून ती चिप या यानासोबत मंगळ ग्रहावर पाठविली जाणार आहे. हे रोव्हर मंगळ ग्रहावर उतरून मंगळावर कधीकाळी सूक्ष्मजीव होते किंवा असतील का याचा अभ्यास करून त्याची माहिती पृथ्वीवर पाठविणार आहे. ही मोहीम भविष्यात मंगळावर माणूस पाठविण्याच्या दिशेने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जनसामान्यांमध्ये अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती व्हावी तसेच विद्यार्थी प्रेरित होऊन भविष्यात त्यांच्यामधून अनेक अंतराळवीर पुढे यावे यासाठी या संस्थेने मंगळावर नाव पाठविण्याचा उपक्रम राबविला आहे.
साळविंडे ही म्हसळा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेची शाळा. शेजारच्या वाडी वस्तीतील विद्यार्थी डोंगरातून वाट काढून या शाळेत शिकण्यासाठी येतात. शिक्षक संदीप जाधव व गणेश अकोलकर यांनी मुख्याध्यापक भगवान सोनुने यांच्या सहकार्याने १ ली ते७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाची आॅनलाइन नोंदणी केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मंगळ ग्रहाबद्दल उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी प्रेरित होऊन मंगळ ग्रह व नासा या संस्थेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेताना दिसत आहेत. या कामात साळविंडे देवळाची वाडी, बागाची वाडी, व ताडाची वाडी या गावातील पालक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.
>विद्यार्थ्यांची मार्स २०२० या प्रकल्पासाठी नोंदणी करून आम्ही विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षरतेचा दिशेने नेत आहोत. भविष्यात निश्चितच या विद्यार्थ्यांकडून विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.
- संदीप जाधव,
विज्ञान शिक्षक.
>आमच्या सरांनी मंगळयानासाठी आमची नोंदणी करून आमची या ग्रहाविषयीची उत्सुकता वाढविली आहे.
- साहिल जयेश सावंत, विद्यार्थी
विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध उपक्रमात सहभागी करून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अनुभव देऊन प्रेरित करत आहेत.
- गणेश भुवड, एस.एम.सी. अध्यक्ष.

Web Title: Salvinde will be the name of students of the school of Mangalaya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.