बारा कोटींचा निधी मिळूनही रस्त्याची दैना
By Admin | Updated: April 30, 2017 03:43 IST2017-04-30T03:43:56+5:302017-04-30T03:43:56+5:30
अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती

बारा कोटींचा निधी मिळूनही रस्त्याची दैना
अलिबाग : अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कार्यादेश काढण्यास दिरंगाई झाली. त्याचा नाहक त्रास या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांना घेराव घालून जाब विचारला.
शनिवारी शेकापचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. परिणामी, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग पुरता हादरून गेला आहे.
दरम्यान, अभियंता व्ही. बी. पाटील यांनी शुक्रवारी सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग-रेवस रस्त्याचे काम सत्वर सुरू करणार, असे लेखिपत्र दिले तर येत्या ३ मेपर्यंत कार्यादेश काढण्यात येणार असून १५ मेपर्यंत रस्त्याचे काम सुरू होईल, अशी लेखी हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. एस. देशपांडे यांनी शनिवारी दिलीप भोईर यांना दिली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
अलिबाग-रेवस हा २२ कि.मी. मार्गावरील रस्ता गेली काही वर्षे खड्ड्यांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अलिबाग-रेवस आणि कनकेश्वर-कार्लेखिंड या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी अलिबाग-रेवस रस्त्यावर आरसीएफ गेटसमोर रास्ता रोको आंदोलन पुकारले. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तथा विक्र म मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सकाळी ९:३० वाजल्यापासून सारळ पूल, मांडवा दस्तुरी, झिराड नाका आणि आर.सी.एफ.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता अडविण्यात आला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, नितीन राऊत, दीपक म्हात्रे, तसेच रिक्षाचालकांसह स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. तातडीने रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, दर्जा राखावा, अशी मागणी होत होती. या वेळी अलिबाग-रेवस मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. (विशेष प्रतिनिधी)
रस्त्याचे काम १५ मेनंतर
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देशपांडे घटनास्थळी आले. रस्त्याचे काम १५ मे नंतर करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांना धारेवर
धरले.
- अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ पुलापासूनच आंदोलनाला सुरूवात झाली होती. ठिकठिकाणी वाहने अडविण्यात येत होती. जवळपास दीड ते पावणेदोन तास वाहतूककोंडी झाली होती.