अवजड वाहतुकीमुळे खचतेय वेळास-फर्शी येथील रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 23:31 IST2015-07-30T23:31:16+5:302015-07-30T23:31:16+5:30
दिघी पोर्टवर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अवलंबून आहे. दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते नेहमीच अपघाताचे कारण ठरले आहे.

अवजड वाहतुकीमुळे खचतेय वेळास-फर्शी येथील रस्ते
बोर्ली-पंचतन : दिघी पोर्टवर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अवलंबून आहे. दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते नेहमीच अपघाताचे कारण ठरले आहे. दिघी पोर्टवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वेळास-फर्शी येथील सात नाल्यांची मोरी खचत आहे. याबाबत सोमवारी उपविभाग अधिकारी (प्रांत) तहसीलदार व दिघी सागरी पोलीस ठाणे यांना येथील नागरिक सचिन दळवी यांनी लेखी निवेदन दिले आहे.
दिघी ते माणगाव रस्त्यावर या अगोदर अनेक अपघात झाले आहेत, ते दिघी पोर्टवरील अवजड वाहनांमुळेच. म्हसळा घोणसे घाट, मोर्बे घाटात अनेक वेळा अपघात होवून कित्येकांचे बळी गेले आहेत.
वेळास येथील सात नाल्यांची मोरी खचत आहे. दिघी पोर्ट लिमिटेडमधून पॉस्को कंपनीच्या कॉईल्स, कोळसा, बॉक्साईडची निर्यात होत असते व पोर्टच्या बांधकामांसाठी अवजड लोखंडी पट्ट्या, प्लेट, खडी, रेती, डबर क्रशसॅन्ड यांची वाहतूक चालू आहे. दिघीपोर्टच्या या वाढत्या अवजड वाहतुकीने हा रस्ता व मोरी खचण्याच्या मार्गावर आहे.
रस्ता खचला तर जिल्ह्याचे महत्त्वाचे कार्यालयीन कामाचे ठिकाण असलेल्या अलिबाग येथे जाणे व या रस्त्यावरून दिघी कुडगाव, हरवित, आदगांव, सर्वे रोहिणी, तुरूंवाडी, सावर्डे आदिवासीवाडी लोकांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
पोर्टचे दुर्लक्ष
वेळास फर्शीपासून दिघीकडे जाणाऱ्या १६० मीटरच्या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना उपचारासाठी बोर्ली पंचतन, श्रीवर्धन येथे दवाखान्यात न्यावे लागत असल्याने हाल होतात. याबाबतीत तक्रार करूनही पोर्टच्या व्यवस्थापकांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.