महामार्गालगतच्या गावाचा रस्ता खचला
By Admin | Updated: November 6, 2016 04:08 IST2016-11-06T04:08:21+5:302016-11-06T04:08:21+5:30
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावासमोरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना दिवसाआड अपघात होत आहेत. बारवई ग्रामस्थांनी

महामार्गालगतच्या गावाचा रस्ता खचला
मोहोपाडा : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावासमोरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना दिवसाआड अपघात होत आहेत. बारवई ग्रामस्थांनी याबाबत आयआरबीच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्कसाधला आहे. मात्र प्रत्येक वेळी आठवडाभरात रस्त्याचे काम करू, असे आश्वासन गेल्या दोन महिन्यांपासून दिले जात आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे चालक, नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांची संख्याही वाढली असून यात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे.
मुंबई-पुणे महामार्गांवर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. बारवई गावाचे प्रवेशद्वार मुख्य वाहतूक रस्त्यालगतच असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. शिवाय बारवई गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव चालवली जातात. त्यातच येथील रस्ता खचल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नवरात्रोत्सवापासून अंदाजे पन्नासपेक्षा अधिक दुचाकींचा याठिकाणी अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. रस्ता दुरुस्तीसाठी बारवई ग्रामस्थांनी अनेकवेळा आयआरबीचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता केवळ टाळाटाळ करण्यात येते. येथील रस्त्याची बिकट अवस्था पहाता, मोठी दुर्घटना घडल्यावरच संबंधित विभागाचा जाग येणार का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
बारवईजवळील रस्त्याची देखरेख, नियंत्रणासाठी भिंगारवाडीजवळ टोलनाका आहे. टोल घेतला जात असतानाही बारवई गावासमोरील रस्त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)
मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई गावासमोरील खचल्याच्या रस्ताचे काम तीन ते चार दिवसातच सुरू करतो. तसेच लोणावळा ते पनवेल या रस्त्याला पुन्हा डांबरीकरण करण्याचे काम लवकरच सुरू होईल.
- श्रीनिवास शिंदे,
आयआरबीचे अधिकारी.