रस्ते बांधणीची प्रक्रिया अपूर्ण
By Admin | Updated: October 21, 2016 04:26 IST2016-10-21T04:26:42+5:302016-10-21T04:26:42+5:30
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ता बांधण्याची प्रक्रिया पूर्ण न के ल्यानेच

रस्ते बांधणीची प्रक्रिया अपूर्ण
अलिबाग : अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ता बांधण्याची प्रक्रिया पूर्ण न के ल्यानेच (ट्रिटमेंट अपुरी) रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. पाटील यांनी दिलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पाहणी अहवालात मान्य केले आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजय उपाध्ये आणि किशोर अनुभवणे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत हा अहवाल प्राप्त झाला आहे. याच अहवालाच्या अनुषंगाने रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार धरुन रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक या सात जणांना प्रतिवादी करुन त्यांच्या विरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असल्याची माहिती अॅड. अजय यशवंत उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग क्षेत्रातील, प्रमुख राज्य मार्ग क्र.४ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रेवस’, राष्ट्रीय महामार्ग क्र. ८९ दर्जाचा ‘थळ-वायशेत-कार्लेखिंड’, राष्ट्रीय महामार्ग क्र.८९ दर्जाचा ‘पोयनाड-नागोठणे’, प्रमुख राज्य मार्ग क्र.४ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रेवदंडा’, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९१ च्या दर्जाचा ‘अलिबाग-रोहा’ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३० च्या दर्जाचा ‘चौल-वावे-बेलोशी’ या सहा प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पाहणीचा अहवाल अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी.पाटील यांनी दिला आहे. या रस्त्यांवरुन रस्त्याच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहू वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या पावसाळ््यात जुलै २०१६ मध्ये २० दिवसांच्या कालावधीत ९६ टक्के अतिवृष्टी झाली तर रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांच्या फाद्यांवरुन सतत पाण्याचे थेंब रस्त्यावर पडत राहिल्याने खड्डे पडल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अवजड वाहनांची वाहतूक अतिवृष्टी आणि रस्त्याला दिलेली ट्रिटमेंट अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
- सामाजिक कार्यकर्ते अॅड.अजय उपाध्ये, किशोर अनुभवणे यांनी दाखल केलेल्या दाव्यात रस्ते मुदतीत दुरुस्त केले नाहीत तर प्रतिवादींचे दरमहा वेतन रोखून धरावे, जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत रोड टॅक्स घेवू नये अशी विनंती न्यायालयास केली. या दाव्याची सुनावणी २२ आॅक्टोबरला आहे.