नद्या, तलावांनी गाठला तळ
By Admin | Updated: May 25, 2016 04:36 IST2016-05-25T04:36:36+5:302016-05-25T04:36:36+5:30
पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नद्या, तलावांनी गाठला तळ
- कांता हाबळे, नेरळ
पावसाच्या पाण्याचे वेळीच नियोजन न केल्याने रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे अनेकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. परंतु पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. शासनाने काही प्रमाणात जलसंधारणसारख्या योजना राबवून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना फारसे यश न आल्याचे या भीषण पाणीटंचाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील तलाव, धरणे, नद्या आणि पाझर तलावाच्या पातळीत कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील विहिरी, बोअरवेल, नळपाणी योजना यांच्यावर झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
कर्जत तालुक्यात खांडस, वरई-अवसरे, जामरु ख, अंभेरपाडा, कशेळे अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी अडवून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मध्यमातून पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच खांडपे, डोंगरपाडा आणि बलिवरे येथे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे प्रकल्प यांची उभारणी सुरु केली. या पाझर तलावांचे पाणी शेतीला सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने पाली-भूतिवली आणि पाषाणे या ठिकाणी उच्च स्तरावर लघुपाटबंधारे प्रकल्प उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मागील वर्षीच्या पावसाळ्यात पडलेले कमी पर्जन्य यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीसाठा करणाऱ्या अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांच्यातून खाली नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत असून या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी पाझर तलाव आणि पाटबंधारे प्रकल्प यातील धरणाच्या जलाशयात यापुढे पाणीपुरवठा योजनांची उद्भव विहीर बांधली तर भविष्यात नळपाणी योजनांचे पाणी संपणार नाही. अशी नळपाणी योजना पाणीपुरवठा विभागाने राबविली नसल्याने आता अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
झाडे आणि वनराईने नटलेल्या कर्जत तालुक्यातील पावसाचे पाणी अडविण्याची मोहीम राज्य सरकार आणि रायगड जिल्हा परिषदेने १९८० च्या दशकात घेतली होती. त्यातून सरकारी धोरणामुळे कर्जत तालुक्याच्या सर्व भागात पाझर तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यातील सर्व प्रकल्प हे जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळी प्रलंबित होता आणि आजही कायम आहे.
शासनाने ज्या नळपाणी योजना राबविल्या त्यातील काही पाणी योजना या पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्पाचा उद्भव म्हणून वापर केला गेला. तालुक्यातील १०० हून अधिक आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. अधिकाऱ्याचे नियोजन चुकले.
जर तालुक्यातील सर्व पाणी योजना वेगवेगळ्या भागातील पाझर तलाव,पाटबंधारे प्रकल्प यांच्या जलाशयावर अंतर्भूत करून केल्या असत्या तर आज कर्जत तालुक्याच्या कोणत्याही भागात पाणीटंचाई जाणवली नसती.अनेक नळपाणी योजना बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत.
पाझर तलावामधून पाणी खाली सोडण्याचे बंद केले आहे. पाझर तलावामध्ये जो पाणी साठा वाहत नाही, तोच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्या पाण्याचा उपयोग फक्त टँकर भरण्यासाठीच होऊ शकतो. साधारणत: २० दिवस हे पाणी पुरवू शकतो.
- बी.आर. कांबळे, उप अभियंता, लघु पाटबंधारे विभाग कर्जत