सैनिकी विद्यालयाला पुनरुज्जीवन
By Admin | Updated: July 30, 2015 00:13 IST2015-07-30T00:13:08+5:302015-07-30T00:13:08+5:30
एकेकाळी कोकणचे वैभव म्हणून रायगड सैनिकी विद्यालयाची ओळख होती. मात्र विश्वस्तांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला बळी पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे.

सैनिकी विद्यालयाला पुनरुज्जीवन
महाड : एकेकाळी कोकणचे वैभव म्हणून रायगड सैनिकी विद्यालयाची ओळख होती. मात्र विश्वस्तांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला बळी पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे.
तालुक्यातील आचकोली येथील रायगड सैनिकी विद्यालयाच्या पुनरुज्जीवनासाठी आता विद्यालयाचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी शहरातील बाजारपेठेतून आचकोली येथील विद्यालयापर्यंत दिंडी काढून संस्थेच्या विश्वस्तांच्या गैरकारभाराचा निषेध केला. या दिंडीत विद्यालयाच्या सत्तर माजी विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांनी कोकणातील तरुण सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी व्हावेत, या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी रायगड सैनिकी विद्यालय उभारले. अल्पावधीतच नावारुपास आलेल्या विद्यालयात संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तांनी सुरू केलेल्या मनमानीमुळे गेल्या पाच - सहा वर्षांपासून उतरती कळा लागली. पदाधिकारी विश्वस्तांमध्ये मतभेद, खरेदीतील गैरव्यवहार, देणग्या व परीक्षा शुल्कात भ्रष्टाचार तसेच गलथान व्यवस्थापनामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली आणि गेल्या दोन वर्षांपासून हे विद्यालय बंद करण्याची वेळ विश्वस्तांवर आली. विद्यालय बंद पडल्यामुळे क्रांतीसिंह यांचे स्वप्न भंग झाल्याचे आजच्या विद्यालयावर आलेली अवकळा पाहून स्पष्ट होत आहे. अचानक विद्यालय बंद पडल्याने सुमारे १२५ कर्मचाऱ्यांवर गेल्या दोन वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे.
रायगड सैनिकी विद्यालस पूर्ववत सुरू व्हावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून नव्याने विद्यालय सुरू करावे, यासाठी हे माजी विद्यार्थी शिक्षणमंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेणार आहेत. वेळ पडल्यास स्वत: विद्यालय चालवण्यास तयार असल्याचेही माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. बाजापेठेतून काढण्यात आलेल्या दिंडीचा समारोप सैनिकी विद्यालयात करण्यात आला. या दिंडीत सुशांत पोळ, अमित ठाकूर, चिराग दळवी, वैभव गोडबोले, वैभवी मिरकुटे, रत्नाली कलगुटकर आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
विश्वस्तांची मनमानी कारणीभूत
अल्पावधीतच नावारुपास आलेल्या विद्यालयात संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तांनी सुरू केलेल्या मनमानीमुळे गेल्या पाच - सहा वर्षांपासून उतरती कळा लागली. पदाधिकारी विश्वस्तांमध्ये मतभेद, खरेदीतील गैरव्यवहार, देणग्या व परीक्षा शुल्कात भ्रष्टाचारामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली.
माजी विद्यार्थी विद्यालय चालविण्यास तयार
रायगड सैनिकी विद्यालस पूर्ववत सुरू व्हावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करून नव्याने विद्यालय सुरू करावे, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेणार आहेत. वेळ पडल्यास स्वत: विद्यालय चालवण्यास तयार असल्याचेही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.