सायन-पनवेल महामार्गाची दुरुस्ती तकलादू

By Admin | Updated: July 24, 2015 03:19 IST2015-07-24T03:19:07+5:302015-07-24T03:19:07+5:30

१२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्या पावसातच महामार्गावर मोठमोठे खड्डे

Repair of Sion-Panvel Highway | सायन-पनवेल महामार्गाची दुरुस्ती तकलादू

सायन-पनवेल महामार्गाची दुरुस्ती तकलादू

वैभव गायकर, पनवेल
१२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्या पावसातच महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानंतर ते खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनंतर दुरुस्तीचे हे काम तकलादू असल्याचे उघड झाले आहे.
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि या कंपनीला देण्यात आले होते. या महामार्गाचे रुंंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. नव्याने पाच उड्डाणपूल सानपाडा, नेरुळ, उरणफाटा, कामोठे व खारघर कामोठ्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा समावेश आहे. पहिल्या पावसातच सर्व उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले होते. यावेळी अनेक लहान-मोठे अपघात देखील झाल्याने वाहनचालकांनी देखील याबाबत मोठी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, मात्र पुन्हा एकदा या उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.
पैकी उरणफाटा उड्डाणपुलावर सर्वात जास्त खड्डे पडलेले असून याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कामोठे, सानपाडा, नेरुळ तसेच खारघरजवळील उड्डाणपुलावर हीच अवस्था असल्याचे पाहावयास मिळत आहे. वाशी टोलनाक्यापासून कळंबोली सर्कलपर्यंत हे खड्डे अधून-मधून पाहावयास मिळत आहेत. महामार्गावरील झालेला खर्च वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला आहे. मात्र टोल वसूल करून देखील महामार्गावर देखरेखीकडे दुर्लक्ष होताना दिसते.
संपूर्ण काँक्रिटीकरण करून उभारलेल्या या मार्गाचे अजूनही काम काही ठिकाणी अर्धवटच ठेवण्यात आले आहे. कामोठे शहरालगत उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे. शहरामधून बाहेर पडण्यासाठी कामोठे बस थांब्यापासून उड्डाणपुलावरून जाण्याचा खडतर मार्ग यासाठी पार करावा लागतो. याठिकाणाहून जाताना अनेक अपघात घडत असतात. कोपरा गाव, हिरानंदानी उड्डाणपुलाखाली, नेरुळ याठिकाणी कामे अर्धवट ठेवली असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Repair of Sion-Panvel Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.