नाट्यगृह उभारणीतील अडथळा दूर
By Admin | Updated: February 27, 2016 01:27 IST2016-02-27T01:27:56+5:302016-02-27T01:27:56+5:30
माणगाव तालुक्यात नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जिल्हा प्रशासनाला पुन्हा पाठविला आहे. सुधारित अंदाजपत्रक आणि आराखडे हे प्राप्त होणाऱ्या निधीच्या

नाट्यगृह उभारणीतील अडथळा दूर
- आविष्कार देसाई, अलिबाग
माणगाव तालुक्यात नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जिल्हा प्रशासनाला पुन्हा पाठविला आहे. सुधारित अंदाजपत्रक आणि आराखडे हे प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चात सीमित करून पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. परिपूर्ण प्रस्ताव लवकरच सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नाट्यगृह उभारणीमधील अडथळा दूर होऊन माणगावकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतील हे नाट्यगृह आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात २१ मे २०१३ ला बैठक झाली होती. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नाट्यगृह उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सुमारे १० कोटी ४४ लाख ११ हजार ३९५ रु.च्या खर्चाचा ढोबळ आराखडा तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत पर्यटन व सांस्कृतिक विभागाला पाठविला होता. मात्र नियमानुसार ‘ब’ आणि ‘क’ वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये सरकारकडून ६००-८०० खुर्च्यांच्या नाट्यगृहासाठी चार कोटी रुपये देता येतात. त्यामध्ये ९५ टक्केप्रमाणे ३ कोटी ८० लाख सरकारकडून, पाच टक्केप्रमाणे २० लाख रु.चा हिस्सा हा संबंधित नगरपालिकेचा असतो. मात्र माणगावच्या नाट्यगृहासाठी तब्बल १० कोटी ४४ लाख ११ हजार ३९५ रु . खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे नियमबाह्य एवढा निधी देता येत नसल्याने प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चात आराखडा देण्याच्या सूचना सरकारकडून जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे सुमारे चार कोटींच्या खर्चाचा आराखडा पुन्हा तयार करून सरकारला सादर करण्यात येणार आहे.
वाजवीपेक्षा जास्त खर्चाचा प्रस्ताव असल्याचे कारण देत नाट्यगृहाचा प्रस्ताव परत आला आहे. सुधारित अंदाजपत्रक आणि आराखडे सीमित करून पाठविण्याचे पत्र १५ सप्टेंबर २०१५ ला अवर सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले. जिल्हा नियोजन समितीकडून नाट्यगृहाचा परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविला आहे. त्यांच्यामार्फत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव म्हणाले.
सुसज्ज नाट्यगृह ; माणगावचे नगरपंचायतीत रु पांतर
अर्थमंत्री असताना सुनील तटकरे यांनी माणगावकरांना सुसज्ज नाट्यगृह देण्याचे ठरविले होते. पहिल्या टप्प्यात निधी पदरात पाडून पुरवणी खर्चाच्या माध्यमातून उर्वरित निधी मिळाला असता. ५ कोटीच्या वर खर्च गेल्यास नगर विकास, तसेच त्या पुढेही खर्च जाणार असेल, तर कॅबिनेटमध्ये परवानगी घेण्याची त्यांची योजना असावी.
त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यावेळी तटकरे यांनी जाणले होते की, माणगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर हे नगर पंचायतीमध्ये होणार आहे. ही दूरदृष्टी ठेवूनच त्यांनी माणगावची निवड केली असल्याचे बोलले जाते. नाट्यगृहाच्या प्रस्तावामुळे नागरिक आनंदात आहेत.
यासाठी नाट्यगृह : माणगाव हे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. माणगावची लोकसंख्या सुमारे एक लाख ५८ हजार ७४० आहे. येथूनच श्रीवर्धन हा राज्यमार्ग सुरू होत असून, दिवेआगर, हरिहरेश्वर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विळेभागाड एमआयडीसी येथे आहे. त्याचप्रमाणे रोहे, महाड हे तालुके आसपास आहेत. प्रस्तावित दिघी पोर्टही आहे. माणगावच्या जवळ असणाऱ्या तालुक्यात सुमारे १५० ग्रामपंचायती आहेत. या सर्वांचा विचार करूनच येथे नाट्यगृह उभारण्यात येत आहे.