खारेपाटात आढळले दुर्मीळ खवले मांजर

By Admin | Updated: October 24, 2016 02:40 IST2016-10-24T02:40:18+5:302016-10-24T02:40:18+5:30

वन्य प्राण्यांची भटकंती सध्या अन्नाच्या शोधात दूरवर होवू लागली आहे. पोटाची भूक शमविण्यासाठी आता ते लोकवस्तीमध्ये बेधडक घुसत आहेत.

The rare squirrel cat found in the saline | खारेपाटात आढळले दुर्मीळ खवले मांजर

खारेपाटात आढळले दुर्मीळ खवले मांजर

पेण : वन्य प्राण्यांची भटकंती सध्या अन्नाच्या शोधात दूरवर होवू लागली आहे. पोटाची भूक शमविण्यासाठी आता ते लोकवस्तीमध्ये बेधडक घुसत आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे, अजगर यापाठोपाठ दुर्मीळ खवले मांजराचा प्रवासही गाव खेडे परिसरात सुरू झाला आहे. सध्या शिवारात भात कापणी सुरू असून शेताच्या बांधावरील उंच गवताच्या आड भक्ष्य शोधण्यासाठी दुर्मीळ खवले मांजर वाशी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी गावाबाहेरील घराच्या परिसरात आढळून आले.
मासे पकडण्याच्या जाळ्यांनी या मांजरास जेरबंद करून वनखात्यास पाचारण करण्यात आले. ही दुर्मीळ प्रजाती वनपालाच्या स्वाधीन करण्यात आली. एक थरारक क्षण म्हणून या घटनेची वाच्चता होवून वाशी ग्रामस्थांनी खवले मांजर पाहण्यासाठी एकच गर्दी केली. गावकरी धनाजी ठाकूर यांच्या घराशेजारील रस्त्यावर हे मांजर आढळले. त्यांनी या प्रजातीस ओळखून इतर गावकऱ्यांच्या सहाय्याने पकडले. शेजारील पावळ किंवा धामणी वनातून हे मांजर खारफुटी जंगलाकडे भक्ष्याच्या शोधात आले असावे असा अंदाज आहे. सायंकाळच्या वेळी दिवे लागणीच्या सुमारास वाशी गावाकडे आले.
वनविभाग पेणचे परिक्षेत्र वन अधिकारी एस. आर. पवार, परिमंडल अधिकारी पी. के. म्हात्रे त्यांचे सहकारी पोईलकर यांनी तातडीने घटनास्थळी जावून ते खवले मांजर ताब्यात घेतले. अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने या मांजरास भक्ष्याची अनुकूलता असलेल्या जंगल परिक्षेत्रात शनिवारी रात्री ९.३० वाजता सोडण्यात आले. ८ किलो वजन, १ मीटर लांब असे हे दुर्मीळ खवले मांजर रात्रीच्या अंधारात जंगलात वेगाने लुप्त झाले आणि हे थरारक नाट्य संपले. (वार्ताहर)

Web Title: The rare squirrel cat found in the saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.