नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीत रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:12 IST2020-01-13T00:11:30+5:302020-01-13T00:12:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीत रॅली
खोपोली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रविवारी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली होती.
भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणांनी बाजारपेठ दणाणून गेली. हायको कॉर्नरपासून निघालेल्या रॅलीत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीत तिरंगा झेंडा घेतलेले शेकडो तरुण व विविध स्तरातील, समाजातील नागरिक सहभागी झाले होते. बाजारपेठ, दीपक हॉटेल चौक, झेनिथ कॉर्नर, वरची खोपोली, केएमसी महाविद्यालय, पोलीस ठाणे मार्गे आलेल्या रॅलीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात समाप्ती झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर आम. ठाकूर यांनी रॅलीस संबोधित करताना सीएए कायद्याच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवून देशात अशांतता पसरवणाऱ्या लोकांवर शरसंधान साधले व हा कायदा येथील अल्पसंख्याकांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. प्रमुख वक्ते बजरंग दलाचे माजी प्रांत संयोजक उमेश गायकवाड यांनी या देशाचे पुन्हा तुकडे करण्यासाठी काही शक्ती देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. खोपोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून रॅलीत सहभाग घेतला.