Rainstorm in Panvel too | पनवेलमध्येही पावसाचा कहर

पनवेलमध्येही पावसाचा कहर

पनवेल : पनवेलमध्ये बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत सुमारे ६०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली आहेत. तर १०० पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग वादळापेक्षाही जास्त तीव्रता या वादळी पावसाची असल्याने या वेळी विशेषत: शहरी भागात मोठे नुकसान झाले आहे.

1बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाचा कहर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मागील २४ तासांत सुमारे २१७ मिमी पावसाची नोंद पनवेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने कळंबोली, पनवेल शहरातील वीजपुरवठा सुमारे १० तासांपेक्षा जास्त काळ खंडित झाला होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणलादेखील वीजपुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत असल्याने अनेक भागातील नागरिकांना संपूर्ण रात्रच अंधारात काढावी लागली. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल शहर, तळोजा आदींसह ग्रामीण भागात या वादळी वाºयाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात इमारतींच्या छतावरील पत्रे वादळामुळे या वेळी उडाल्याचे पाहावयास मिळाले.

2गुरुवारी तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. या वेळी ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम पालिका, सिडको तसेच नागरिकांच्या माध्यमातून सुरू होते. रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी पालिकेमार्फत ९ पथके तयार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त तेजस्विनी गलांडे यांनी दिले. वादळाची तीव्रता मोठी असल्याने प्राथमिक अंदाजावरून ६०० झाडे उन्मळून पडल्याची माहिती गलांडे यांनी दिली. यासंदर्भात सर्व्हे सुरू असून, दोन दिवसांत ही माहिती समोर येईल, असे गलांडे यांनी सांगितले. दरम्यान, या वादळी पावसाची कोणतीच सूचना हवामान खात्याच्या माध्यमातून दिली गेली नसल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे.प्राथमिक अंदाजात १०० पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले आहे.

3या वादळी पावसात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. यासंदर्भात पंचनामा सुरू असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिली.निसर्ग वादळापेक्षा जास्त नुकसान या वेळी पनवेलमध्ये झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोनाची वाढती साथ त्यातच चक्रीवादळ यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजवाहिन्या तसेच विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणमार्फत परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
 

Web Title: Rainstorm in Panvel too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.