रायगड, ठाण्यातील ८९ गावे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:30 IST2018-03-28T00:30:14+5:302018-03-28T00:30:14+5:30

पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे गठीत माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन नियंत्रण समितीची बैठक

In Raigad, Thane, 89 villages are sensitive | रायगड, ठाण्यातील ८९ गावे संवेदनशील

रायगड, ठाण्यातील ८९ गावे संवेदनशील

अलिबाग : पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे गठीत माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन नियंत्रण समितीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समितीकडे करावयाच्या तक्र ारी, तसेच या क्षेत्रात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये, सेवानिवृत्त सनदी अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरिता गठीत करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीची दुसरी बैठक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेन्वये या संदर्भात रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही अंशत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसीलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकासविषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नूतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता आहे. या समितीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी त्यांचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे सपूर्द करावेत. असे तक्रार अर्ज सनियंत्रण समितीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या कामासाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांच्याकडे सनियंत्रण समितीच्या बैठकीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Web Title: In Raigad, Thane, 89 villages are sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.